देऊळगाव घुबे व इसरूळ शिवारातील अवैध रेती साठ्यावर कारवाई..!

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-रेतीचा लिलाव; तहसीलदार चिखली कार्यालयाकडून अधिकृत परवानगी

इसरूळ (भिकनराव भुतेकर) : मौजे इसरूळ (ता. चिखली) शिवारात टाकण्यात आलेल्या अवैध रेती साठ्यावर महसूल प्रशासनाने तात्काळ कारवाई करत ३ ब्रास रेतीचा पंचनामा करून अधिकृत लिलाव केल्याची माहिती तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, चिखली यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ग्राम महसूल अधिकारी इसरूळ यांच्या प्रतिवेदनानुसार दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ५.३० ते ६.०० वाजेच्या दरम्यान मंडपगाव–इसरूळ रस्त्यावर अज्ञात वाहनातून सुमारे ३ ब्रास अवैध रेती टाकण्यात आली असून संबंधित वाहन घटनास्थळावरून पसार झाले होते. याची माहिती मिळताच सकाळी ८.३० ते ९.०० वाजेदरम्यान घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. मा. जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या खनिकर्म विभागाच्या आदेशानुसार सदर अवैध रेतीचा तत्काळ लिलाव करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार ग्राम महसूल अधिकारी इसरूळ अनिल बोन्द्रे यांनी लिलाव प्रक्रिया पूर्ण करून अहवाल तहसील कार्यालय, चिखली येथे सादर केला.

लिलाव प्रक्रियेत अजय अशोक फुलझाडे (रा. चिखली) यांनी प्रति ब्रास ४,००० रुपये अशी सर्वाधिक बोली लावत एकूण ३ ब्रास रेती खरेदी केली. यासाठी रेती किमतीपोटी १२,००० रुपये, त्यावर डीएमएफ शुल्क १,८०० रुपये तसेच आयकर शुल्क ३६ रुपये असा एकूण शासकीय भरणा शासकीय चलनाद्वारे करण्यात आला असल्याची नोंद करण्यात आली आहे. तहसीलदार चिखली कार्यालयाकडून दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ५ या कालावधीतच रेती उचलण्याची परवानगी देण्यात आली होती. रेती वाहतूक केवळ ठराविक वाहन क्रमांक MH-28 0178 द्वारेच करण्याचे बंधन घालण्यात आले होते. तसेच सदर रेती केवळ नमूद शासकीय कामासाठीच वापरण्याच्या स्पष्ट अटी घालण्यात आल्या होत्या. दिलेल्या वेळेनंतर किंवा इतर ठिकाणी रेती वाहतूक आढळल्यास ती अवैध मानून कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच कालावधी संपल्यानंतर उचल करण्यास कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

रेती उचल पूर्ण झाल्यानंतर संबंधित मंडळ अधिकारी शेलगाव आटोळ तसेच ग्राम महसूल अधिकारी इसरूळ यांनी पंचनामा व सविस्तर अहवाल तहसील कार्यालयास सादर केला. ही संपूर्ण कारवाई तहसीलदार विजय सवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. दरम्यान, या प्रकरणाबाबत नायब तहसीलदार चिखली मुरलीधर गायकवाड यांनी सांगितले की, दिनांक २४ डिसेंबर रोजी पहाटे चारच्या सुमारास चिखली महसूल पथक इसरूळकडे येत असल्याची माहिती अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांना त्यांच्या लोकेशन देणाऱ्यांकडून मिळाली. कारवाईच्या भीतीने देऊळगाव घुबे शिवारात अज्ञात दोन टिप्परमधून रेती टाकून संबंधितांनी पलायन केले. नंतर त्या रेतीचा अधिकृत लिलाव करून शासकीय भरणा घेतल्यानंतर ती कंत्राटदारास देण्यात आली. अवैध रेती उत्खनन व साठ्यावर महसूल प्रशासनाची ही कारवाई भविष्यातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी निर्णायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Share This Article
Exit mobile version