-देऊळगाव घुबे आणि भारतभाऊंची अमर आठवण
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) : सन १९७२ मध्ये भयानक दुष्काळ होता. भारतभाऊ नुकतेच आमदार झालेले होते. दुष्काळात जनतेसाठी काय करता येईल, याचा विचार करत भारतभाऊंनी चिखली तालुक्यातील दुष्काळी गावांचे दौरे सुरू केले होते. त्यातलाच पहिला दौरा आमच्या देऊळगाव घुबे येथे झाला. तो मे महिन्याचा २४ तारखेचा दिवस होता. भारतभाऊंचा माझ्या गावातील सर्वात तरुण कार्यकर्ता मी होतो. कारण माझे वडील आणि भारतभाऊंचे वडील स्व. राजाभाऊ बोंद्रे व स्व. टी. बी. पाटील यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. त्या काळात मलगी ते देऊळगाव घुबे हा रस्ता अत्यंत खराब, दगडधोंड्यांचा व डबराचा होता. आमच्या गावाला एस. टी. बससुद्धा सुरू नव्हती. मलगी फाट्यावरून पायी, बैलगाडीने किंवा दमणीनेच यावे लागायचे. त्या वेळी शासनाच्या जीपने भारतभाऊ मेरा चौकीवरून भरोसा मार्गे देऊळगाव घुबे येथे आले. कोलारा येथील शंकरराव सोलंकी त्यांच्यासोबत होते. आमच्या गावचे स्वर्गीय शेनफड आबा त्या वेळचे सरपंच होते. आमचे गाव शंभर टक्के भारतभाऊंच्या पाठीशी होते आणि भारतभाऊंचेही तितकेच प्रेम आमच्या गावावर होते.
पारावर बसलेल्या मंडळींमध्ये वयस्कर आणि म्हातारे लोकच अधिक होते. सभेचे सूत्रसंचालन माझ्याकडेच होते. भारतभाऊंनी सर्वप्रथम गावात येण्याचे कारण सांगितले. त्या काळात लाऊडस्पीकर वगैरे काहीच नव्हते. बसल्या बसल्या भारतभाऊ बोलत होते. दुष्काळी कामे सुरू करून जनतेला रोजगार द्यायचा आणि त्याच्या मोबदल्यात अन्नधान्य पुरवायचे, यासाठी अंचरवाडीच्या जंगलात गिट्टी खदान सुरू करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. लोक एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. भारतभाऊंसमोर बोलण्याची कुणाचीच हिंमत होत नव्हती. तेव्हा मी उभा राहिलो आणि म्हणालो की, अंचरवाडी येथे तीन-चार किलोमीटर अंतरावर बायामाणसांना जाणे सोयीचे नाही. दिल्लीच्या बादशहाने राजधानी दिल्लीहून हैदराबादला आणि नंतर देवगिरीला नेली, त्यामुळे अर्धे लोक ये-जा करताना मेले, असा टोमणा मारत मी सांगितले की तशीच परिस्थिती आमच्या गावची होईल. आमच्या गावात ई-क्लास जमीन असताना इतक्या दूर गिट्टी खदान सुरू करण्यास मी कडाडून विरोध केला.
तेव्हा सर्व लोक माझ्या बाजूने बोलले. भारतभाऊ माझ्याकडे शांतपणे पाहत ऐकत राहिले आणि “यावर आपण बघू” असे म्हणून सभा संपली. इकडच्या-तिकडच्या गप्पागोष्टी सुरू असतानाच काळा, बिनदुधाचा चहा झाला आणि भारतभाऊ निघून गेले. दोन दिवसांनी आघम साहेब, तहसीलदार, गावात आले. कोतवालाच्या हाताने मला बोलावण्यात आले. शेनफड आबा, गावातील आम्ही दोघे-चार जण तहसीलदार साहेबांसोबत गाडीत बसून सध्या जिथे नागरेचा प्लांट आहे तो स्पॉट दाखवून दिला आणि आमन झिऱ्यावरील ई-क्लासचा स्पॉटही दाखविला. तहसीलदार निघून गेले आणि दोन-तीन दिवसांतच दवंडी झाली की आपल्या गावात गिट्टी खदान सुरू झाली आहे. दोन्ही ठिकाणी गिट्टी खदान सुरू झाली. लोक कामावर जाऊ लागले. मी आणि माझ्यासोबतचे दोघे-चार जण मुकादम झालो. लोकांना काम मिळाले. दर आठवड्याला मस्टरवरून मजुरीचे पैसे आणि अन्नधान्याचे (ज्वारी-गहू) कुपन मिळू लागले. लोक आनंदी झाले. भाऊ, तुम्ही दिनदुबळ्यांना अन्न-पाणी दिले. रस्ते दिले. पिण्याच्या पाण्यासाठी मोठमोठ्या टाक्या बांधून नळयोजनांद्वारे पाणी दिले आणि बायकांच्या डोक्यावरचे हंडे उतरवले. लहान-मोठी धरणे बांधून सिंचनाची व्यवस्था केली आणि आमच्या बंजर भूमीला स्वर्ग बनवले. गावाला शाळा दिली. सर्वकाही भरभरून दिले. पण भाऊ, तुम्ही मात्र आम्हाला कायमचे सोडून गेलात. आम्हाला पोरके करून गेलात.
आजही झोपेतून उठल्या उठल्या तुमचा आवाज कानात घुमतो —
“शेनफड उठला का? खडकपूर्णाचं पाणी पाटाला सुटलं का? पाणीपट्टीचे पैसे भरले का? नाही भरले तर जोड्यानं मारील साल्यांनो! शेनफड, आवळे घेऊन ये! शेनफड, शेरण्या घेऊन ये! चिखलीला आलास की घरी भेटायला ये!” हा प्रेमाचा आवाज आता ऐकू येत नाही भाऊ. तरीसुद्धा तो रोज सकाळी मनात घुमत राहतो. तुमचे उपकार आम्ही मरेपर्यंत विसरू शकत नाही. जोपर्यंत चंद्र-सूर्य अस्तित्वात आहेत, तोपर्यंत तुमचे नाव अजरामर आहे.
तुम्हाला कोटी कोटी प्रणाम, भाऊ.

