-८ टिप्पर जप्त; १ कोटी ६२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात, ८ जणांवर गुन्हा
बुलढाणा (सुरेश हुसे) : जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात प्रशासनाने कंबर कसली असून, मलकापूर तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून खुलेआम वाळूची लूट करणाऱ्या वाळू माफियांवर अखेर धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ८ टिप्पर आणि १६ ब्रॉस वाळू जप्त करत तब्बल १ कोटी ६२ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून, ८ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस स्टेशन एमआयडीसी मलकापूर, दसरखेड भाग–०५ येथे गुन्हा अप. क्र. १७५/२०२५ अन्वये कलम ३०३(२) भा.न्या.सं. तसेच कलम २१(१) व २१(२) गौण खनिज अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये मलकापूर येथील ६, नांदुरा व मोताळा येथील प्रत्येकी एक अशा एकूण ८ जणांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या टिप्पर वाहनांचे क्रमांक MH-28-BB-6174, 2895, 4414, 4172, 1210, 8910, 7935 व 7397 असे आहेत. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहील, असा थेट इशारा प्रशासनाने वाळू माफियांना दिला आहे.

