दिल्लीश्वरांचे आता खैर नाही! ठाकरे बंधूंची वज्रमूठ आवळली; मुंबईच्या शत्रूंना गाडण्यासाठी ‘शिवसेना–मनसे’चा हुंकार!

breakingmah Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ठाकरे बंधू एकत्र
-मुंबईचा महापौर ‘मराठी’च असणार – राज–उद्धव यांची ठाम घोषणा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – मराठी माणसाच्या एकजुटीला सुरुंग लावणाऱ्या आणि मुंबईचे लचके तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दिल्लीकेंद्री राज्यकर्त्यांच्या उरात धडकी भरवणारी घडामोड आज समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या क्षणाची महाराष्ट्र वाट पाहत होता, तो अखेर आज साकार झाला. “कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे” या एका मंत्रावर शिक्कामोर्तब करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी संयुक्त आघाडीची अधिकृत घोषणा केली.

“आम्ही एकत्र आलो आहोत, ते फक्त एकत्र राहण्यासाठीच,” अशा ठाम शब्दांत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या शत्रूंना थेट ललकारले. या घोषणेमुळे मुंबईच्या राजकीय मैदानात मराठी अस्मितेचा महासंग्राम सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईत पार पडलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांच्या देहबोलीतून एकच संदेश स्पष्टपणे जात होता — आता माघार नाही. या ऐतिहासिक युतीमागील भूमिका स्पष्ट करताना राज ठाकरे म्हणाले, “माझ्या एका मुलाखतीत मी सांगितले होते की भांडणांपेक्षा आपला महाराष्ट्र आणि मराठी माणूस मोठा आहे. तिथूनच या प्रवासाची सुरुवात झाली.”

ही युती केवळ जागावाटपापुरती मर्यादित नसून, मराठी माणसाचे अस्तित्व पुसून टाकू पाहणाऱ्या शक्तींविरोधात उभी राहिलेली अभेद्य भिंत असल्याचे दोन्ही नेत्यांनी ठामपणे सांगितले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर तीव्र शब्दांत हल्ला चढवला. “आज मुंबईचे लचके तोडण्याचे काम सुरू आहे. विधानसभेला ‘बटेंगे’च्या गप्पा मारत होते, पण आता मी स्पष्ट सांगतो — जर आता चुकलात, तर संपाल. फुटलात, तर कायमचे संपून जाल,” असा इशारा त्यांनी दिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, “मराठीचा वसा टाकू नका,” असे भावनिक आणि आक्रमक आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.

राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोचरी टीका करताना म्हटले की, “राज्यात जशा लहान मुलांना पळवणाऱ्या टोळ्या फिरत आहेत, तशाच राजकीय पक्ष फोडणाऱ्या टोळ्याही सुसाट सुटल्या आहेत.” पुढे ते म्हणाले, “कोणाला किती जागा मिळणार, हा तांत्रिक विषय आहे. पण मुंबईचा महापौर हा मराठीच असेल आणि तो शिवसेना–मनसेचाच असेल, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट सत्य आहे.” या लढ्यात माध्यमांची भूमिकाही महत्त्वाची असल्याचे सांगत राज ठाकरे यांनी पत्रकारांना थेट साद घातली. “तुमच्या मालकांना किंवा त्यांच्या दिल्लीतील मालकांना काय वाटते, यापेक्षा तुमच्या मराठी काळजाला काय वाटते ते लिहा. ही दोन पक्षांची लढाई नाही, तर मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे,” असे स्पष्ट आवाहन त्यांनी केले.

Share This Article
Exit mobile version