सिंदखेडराजा येथे २५ डिसेंबर रोजी जीवनगौरव पुरस्कार सोहळा

breakingmah Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-साखरखेर्डा येथील सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांचा होणार सन्मान

साखरखेर्डा (अशोक इंगळे) : सिंदखेडराजा येथील डॉ. अल्हाज असद बाबा मेमोरियल ट्रस्टच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, हा सोहळा येत्या २५ डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे. सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

यावर्षी साखरखेर्डा येथील श्री पलसिद्ध महास्वामी मठाचे मठाधिपती, वेदांताचार्य शिवाचार्यरत्न सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. डॉ. अल्हाज असद बाबा मेमोरियल ट्रस्ट ही संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर असून, दरवर्षी सिंदखेडराजा येथे आरोग्य शिबिरांचे आयोजन करून गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा दिली जाते. यावर्षीही कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची परंपरा ट्रस्टने जोपासली आहे.

याच सोहळ्यात वर्ल्ड मेमन ऑर्गनायझेशन, मुंबईचे अध्यक्ष डॉ. इकबाल मेमन ऑफिसर, नागपूर येथील रेड स्वस्तिक संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक टी. एन. भाल यांनाही जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला कार्यकर्त्यांना ‘युमन आयकॉन’ पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, बुलढाणा अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुकेश झवर, डॉ. अमजदखान पठाण, अयाज खान पठाण आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा पुरस्कार सोहळा सिंदखेडराजा येथील हजरत गौस-ए-आझम दस्तगीर बाबा दर्गा परिसरात होणार आहे.

Share This Article
Exit mobile version