वडाळी ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणात तात्पुरती विश्रांती!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-आज सायंकाळी आमरण उपोषण स्थगित
-२६ डिसेंबरपर्यंत दोषींवर निलंबन न झाल्यास ३१ पासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा

सिंदखेड राजा (सुरेश हुसे) : वडाळी (ता. सिंदखेड राजा) ग्रामपंचायतीतील २ लाख ६४ हजार ४२४ रुपयांच्या आर्थिक अफरातफर व अनियमिततेचे प्रकरण चांगलेच तापले असून, प्रशासनाकडून दिलेल्या आश्वासनानंतर आज सायंकाळी जिल्हा परिषद, बुलढाणा समोर सुरू असलेले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र हा लढा इथेच थांबणार नसल्याचा स्पष्ट इशारा आंदोलकांनी दिला आहे.

या प्रकरणात झालेल्या चौकशी अहवालानुसार दोषी ठरलेल्या सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून वसुलीपात्र रक्कम निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधितांना नोटीस बजावून २६ डिसेंबर २०२५ पर्यंत खुलासा सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र केवळ खुलासा नको, तर थेट निलंबन व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांनी उपोषणस्थळी भेट देऊन “नियमानुसार योग्य कारवाई करण्यात येईल,” असे आश्वासन दिल्यानंतर विद्या संदीप कापसे यांनी आज सायंकाळी उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रशासनाला स्पष्ट अल्टिमेटम देण्यात आला आहे.

“२६ डिसेंबरपर्यंत दोषी सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली नाही, तर ३१ डिसेंबरपासून पुन्हा आमरण उपोषण छेडण्यात येईल,” असा ठाम इशारा विद्या कापसे यांनी दिला आहे. या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांना देण्यात आली असूनही प्रत्यक्ष कारवाईचा अभाव दिसून येत असल्याने ग्रामीण भागातील भ्रष्टाचाराबाबत प्रशासन किती कठोर आहे, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सध्या उपोषण तात्पुरते स्थगित असले तरी प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. दोषींवर ठोस कारवाई होते की आंदोलन पुन्हा तीव्र स्वरूप धारण करते, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

Share This Article
Exit mobile version