-ब्रेकिंग महाराष्ट्र भाकीत खरे ठरले
वर्धा (प्रकाश कथले) : जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत वर्धा, देवळी आणि पुलगाव या शहरांत भाजपला मोठा धक्का बसला आहे. मात्र हिंगणघाट, सिंदी रेल्वे तसेच आर्वी येथील नगराध्यक्षपदाचा गड भाजपने शाबूत राखला आहे. आता भाजपच्या तीन नगराध्यक्षपदांच्या पराभवाचे श्रेय कोण घेणार, हाच खरा प्रश्न निर्माण झाला आहे.
गांधीजींनी वर्ध्याला सत्याच्या प्रयोगभूमीचे स्थान दिले होते. मात्र याच वर्ध्यात मतदारांनी भाजपच्या सत्तेच्या प्रयोगाला तीन शहरांत धक्का देत वेगळी प्रयोगभूमी तयार केली आहे. हे भाकीत ब्रेकिंग महाराष्ट्र ने निवडणुकीपूर्वीच वर्तविले होते, ते आता खरे ठरले आहे. हिंगणघाट व सिंदी रेल्वे येथील नगरपालिका निवडणुकांचा गड भाजपचे आमदार समीर कुणावार यांनी समर्थपणे सांभाळला, तर आर्वी येथील नगराध्यक्षपदाचा गड भाजपचे आमदार सुमित वानखेडे यांनी कायम राखला आहे. मात्र तीन नगरपालिकांतील नगराध्यक्षपदाच्या पराभवाचा खरा धक्का जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांना पचवावा लागणार असल्याचे चित्र आहे. वर्ध्याच्या नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत त्यांनी आपल्या निकटवर्तीय उमेदवाराला उतरविले होते. त्यामुळे येथील भाजप उमेदवाराचा पराभव पालकमंत्र्यांच्या जिव्हारी लागणारा ठरला आहे.
वर्ध्याचे नगराध्यक्षपद मतदारांनी काँग्रेसच्या युवा उमेदवार सुधीर पांगूळ यांच्याकडे सोपविले आहे. विजयी झालेले सुधीर पांगूळ यांनी आपले वडील (कै.) भाऊरावजी पांगूळ यांच्या शुचिर्भूत जीवनसाधनेचा वसा समर्थपणे पुढे नेल्याचे मत व्यक्त केले जात आहे. पुलगावचे नगराध्यक्षपद मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवार कविता सुनील ब्राह्मणकर यांच्याकडे सोपविले. विशेष म्हणजे पुलगाव हे भाजपच्या जिल्हाध्यक्षांचे निवासी शहर आहे.
देवळीचे नगराध्यक्षपद अपक्ष उमेदवार किरण ठाकरे या जनतेच्या समस्यांसाठी थेट रस्त्यावर उतरणाऱ्या युवा आंदोलकाकडे गेले आहे. येथे भाजपच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची सभा झाली होती. देवळीत माजी खासदार रामदास तडस यांनी त्यांच्या माजी नगराध्यक्ष पत्नीला आग्रहाने भाजपकडून उमेदवारी दिली होती. त्यामुळे त्यांच्या पराभवाचा हा धक्का माजी खासदार तडस यांच्यासाठीही मोठा मानला जात आहे. आर्वी येथे नगराध्यक्षपदी भाजपच्या स्वाती प्रकाश गुल्हाने विजयी झाल्या. त्यांच्या विजयाचे श्रेय मतदारांसह आमदार सुमित वानखेडे यांना दिले जात आहे. आर्वी, हिंगणघाट आणि सिंदी रेल्वे या नगरपालिकांचे नगराध्यक्षपद भाजपने कायम राखले असून, हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार आणि आर्वीचे आमदार सुमित वानखेडे यांनी केलेल्या कामाला जनतेने पसंतीची पावती दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
सिंदी रेल्वे येथे नगराध्यक्षपदी भाजपच्या तेजस्विनी स्नेहल कलोडे विजयी झाल्या असल्या, तरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) घेत असलेली उभारी पुढील राजकीय समीकरणांची चाहूल देणारी ठरू शकते. देवळी तसेच आर्वी नगरपालिकांतील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे माजी व आजी खासदारांनी पाठिंबा दिलेल्या उमेदवारांना मतदारांनी स्पष्ट नकार दिला. काहींच्या अहंकाराच्या फुग्याला मतदारांनी थेट टाचणी लावल्याचे चित्र या निकालातून स्पष्ट झाले आहे.

