-१८ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी निकाल; नागरिकांना आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन
आळंदी (अर्जुन मेदनकर) : आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीतील नगराध्यक्ष व सदस्य पदासाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया रविवारी (दि. २१) पार पडणार असून, त्यासाठी आळंदी नगरपरिषद निवडणूक विभागासह संपूर्ण प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मतमोजणी केंद्र परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दि. २ डिसेंबर रोजी शांततेत पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी आळंदी नगरपरिषदेच्या टाऊन हॉलमधील मुख्य सभागृहात सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे. संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित व सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक प्रशासनाने जय्यत तयारी केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली.
मतदान यंत्रे (ईव्हीएम) स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आली असून सकाळी ८ वाजता सर्व उमेदवार व त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. मतमोजणी प्रक्रियेसाठी एकूण ३८ अधिकारी व १५ कर्मचारी, असे ५३ जणांचे मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले असून, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी देशमुख यांनी स्पष्ट केले.
मतमोजणी दरम्यान प्रभाग क्रमांक १ ते १० तसेच नगराध्यक्ष पदाचा निकाल जाहीर होईपर्यंत प्रक्रिया सुरू राहणार आहे. मतमोजणी केंद्रात फक्त अधिकृत पासधारकांनाच प्रवेश दिला जाणार असून, केंद्राच्या आत व बाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त राहणार आहे.
आळंदीत शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाखाली आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे व सहकारी कर्मचाऱ्यांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. मतमोजणी केंद्र परिसरात शांतता राखण्याचे तसेच नागरिकांनी, उमेदवारांनी व त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख यांनी केले आहे.
१८ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर रविवारी आळंदी नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून, शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. दि. २ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ ते १० मधून २१ नगरसेवक व एक नगराध्यक्ष पदासाठी मतदान शांततेत पार पडले होते. यासाठी आळंदी नगरपरिषद, महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने समन्वयाने परिश्रमपूर्वक काम केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

