देऊळगाव कोळ शाळेच्या ‘बोलक्या भिंतीं’नी शिक्षणाला दिला नवा आवाज

breakingmah Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-गावकरी–माजी विद्यार्थी–शिक्षकांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित; गटशिक्षणाधिकारी स्वप्नील निकम यांची प्रत्यक्ष पाहणी व विशेष दखल

सिंदखेड राजा (सुरेश हुसे) : “एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ” या संत तुकोबांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड देत देऊळगाव कोळ येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेने ‘बोलक्या भिंती’ हा अभिनव उपक्रम राबवून संपूर्ण सिंदखेड राजा तालुक्याचे लक्ष वेधून घेतले आहे. शाळेच्या भिंतींवर साकारलेले शैक्षणिक संदेश, संस्कारमूल्ये, प्रेरणादायी विचार व रंगीबेरंगी चित्रांनी विद्यार्थ्यांसह पालकांनाही भारावून टाकले आहे.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. गाडे सर व समर्पित शिक्षकवृंद यांनी शाळेच्या शैक्षणिक वातावरणात आमूलाग्र बदल घडवण्याचा संकल्प केला. या संकल्पाला गावकरी, पालक, माजी विद्यार्थी व ग्रामस्थांची भक्कम साथ लाभली. माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित होताच, शाळेशी नाळ जपणारे अनेक माजी विद्यार्थी उत्स्फूर्तपणे पुढे आले. “आपली शाळा अधिक सुंदर आणि ज्ञानसमृद्ध करायची” या भावनेतून निधी उभारणी करून नियोजनबद्ध कामास सुरुवात झाली.

या उपक्रमाअंतर्गत शाळेच्या भिंती केवळ रंगवण्यात न थांबता त्या विद्यार्थ्यांना शिकवण देणाऱ्या ‘बोलक्या’ करण्यात आल्या. गणित, विज्ञान, भाषा, सामान्यज्ञान, जीवनमूल्ये आणि प्रेरणादायी विचारांच्या माध्यमातून शाळेचे संपूर्ण वातावरण शिक्षणमय झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी शाळेकडे अधिक आकर्षित होत असून, शिकण्याची गोडी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. हा उपक्रम तालुक्यात चर्चेचा विषय ठरताच कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी स्वप्नील निकम यांनी तात्काळ दखल घेत केंद्रप्रमुख श्री. डिघोळे सर व श्री. नागरे सर यांच्यासह शाळेला प्रत्यक्ष भेट दिली. बोलक्या भिंतींची संकल्पना, कामाची गुणवत्ता व शिक्षकांचे समर्पण पाहून त्यांनी मुख्याध्यापक व शिक्षकवृंदाचे तोंडभरून कौतुक केले आणि या उपक्रमाला शाबासकीची थाप दिली.

यावेळी बोलताना स्वप्नील निकम म्हणाले की, “अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. देऊळगाव कोळ शाळेचा हा उपक्रम इतर शाळांसाठी निश्चितच आदर्श ठरेल.” तसेच प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. उपक्रमाच्या यशाचे श्रेय मुख्याध्यापक व शिक्षकांनी गावकरी, माजी विद्यार्थी, पालक व सर्व सहकाऱ्यांना दिले. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने असे उपक्रम राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. देऊळगाव कोळच्या ‘बोलक्या भिंतीं’मुळे सिंदखेड राजा तालुक्यात शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श निर्माण झाला असून, अशाच उपक्रमांची लाट तालुक्यातील इतर शाळांमध्येही पसरावी, अशी अपेक्षा पालक व शिक्षणप्रेमींमधून व्यक्त होत आहे.

Share This Article
Exit mobile version