-पाथर्डी शिवारात रात्रीची घटना; तहसीलदार निलेश मडके यांची जानेफळ पोलिसांत तक्रार
मेहकर (तालुका प्रतिनिधी) : तालुक्यातील पाथर्डी शिवारात अवैध मुरूम वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई सुरू असतानाच चालक ट्रॅक्टरसह फरार झाल्याची धक्कादायक घटना १८ डिसेंबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी तहसीलदार निलेश मडके यांनी जानेफळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
ट्रॅक्टरवर कारवाई करत पंचनामा सुरू असतानाच चालकाने अचानक ट्रॅक्टर सुरू करून भरधाव वेगाने घटनास्थळावरून पलायन केले. त्यामुळे संबंधित वाहन जप्त करून पोलीस ठाण्यात जमा करता आले नाही.
या प्रकरणात शासकीय मालमत्ता असलेल्या सुमारे एक ब्रास मुरूमची चोरी करण्यात आल्याचे नमूद करून संबंधित ट्रॅक्टरचा चालक व मालक यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तहसीलदार निलेश मडके यांनी तक्रारीत केली आहे.

