-प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतीकामे ठप्प; न्याय न मिळाल्यास टोकाचा इशारा
दुसरबीड (भगवान नागरे) — दुसरबीड येथील पारंपरिक वहीवाटी बैलगाडी रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी १२ डिसेंबरपासून अन्नत्याग बेमुदत उपोषण सुरू केले असून, आज या आंदोलनाचा पाचवा दिवस उजाडला आहे. मात्र, या गंभीर प्रश्नाकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केला आहे.
दुसरबीड ते जऊळका व इतर गावांना जोडणारा सुमारे २०० वर्षांपासून अस्तित्वात असलेला हा पारंपरिक वहिवाटी रस्ता काही संबंधित शेतकऱ्यांनी बेकायदेशीररीत्या अडवून ठेवल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणात गजानन गोविंदा सांगळे व इतर शेतकऱ्यांचा सहभाग असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. या रस्त्याबाबत वेळोवेळी तहसीलदारांकडे निवेदने सादर करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने शेवटी नाईलाजास्तव उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. या रस्त्यावरून सुमारे २०० शेतकरी आपल्या शेतजमिनीकडे ये-जा करतात. मात्र रस्ता बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांची शेतात जाण्याची वाट पूर्णतः बंद झाली असून, मशागत, पेरणी, फवारणी तसेच शेतमाल वाहतूक ठप्प झाली आहे.
परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर व शेती विकासावर गंभीर परिणाम होत असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. उपोषणस्थळी सतीश भाऊ कायंदे, शेतकरी नेते बालाजी सोसे, मधुकर मामा जायभाये, विजय घोगे, शिवाजी राजे जाधव, धनंजय घुगे, वैभव देशमुख यांच्यासह परिसरातील पत्रकारांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांची विचारपूस केली.
उपोषणकर्ते शेतकरी शिवानंद विठोबा सांगळे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी, “जोपर्यंत वहिवाटी रस्ता खुला केला जात नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही,” असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान, प्रशासनाने दखल न घेतल्यास तहसील कार्यालय परिसरातील चिंचेच्या झाडाला फाशी घेऊन आत्महत्या करण्याचा टोकाचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिल्याने परिसरात तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सिंदखेड राजा तहसील प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, उपविभागीय अधिकारी कार्यालयाने गंभीर दखल घ्यावी तसेच सिंदखेड राजा मतदारसंघातील आमदारांनी मध्यस्थी करून थेट रस्ता किंवा तात्काळ पर्यायी मार्ग खुला करून द्यावा, अशी ठाम मागणी उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केली आहे.

