सततची नापिकी व अतिवृष्टीचा फटका; कर्जाच्या तणावातून शेतकरीपुत्राची आत्महत्या!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

– जऊळका येर्थाल गावावर शोककळा; सहा वर्षांचा मुलगा, नऊ वर्षांची मुलगी पोरकी!

दुसरबीड (भगवान नागरे) : सततच्या अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेले पीक उद्ध्वस्त झाले, वडिलांच्या नावावरील कर्ज फेडायचे कसे आणि उद्याचा संसार कसा चालवायचा या प्रश्नांनी शेतकऱ्याच्या मुलाची झोप उडवली होती. अखेर या विवंचनेला कंटाळून जऊळका येर्थाल येथील गजानन अंबादास काकड यांनी गळफास घेत जीवन संपविले आणि सहा वर्षांचा मुलगा व नऊ वर्षांची मुलगी पोरकी झाली.

 

सततच्या अतिवृष्टीमुळे झालेली नापिकी, वडिलांच्या नावावरील कर्जाचा वाढता ताण आणि संसार चालविण्याची विवंचना यामुळे कंटाळून जऊळका येर्थाल येथील शेतकरी पुत्र गजानन अंबादास काकड (वय ४९) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. १४ डिसेंबर) सायंकाळी आठच्या सुमारास घडली. या घटनेने जऊळका येर्थाल गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.

गजानन काकड यांच्याकडे वडिलोपार्जित दोन एकर शेती होती. आई-वडील दोघेही वृद्ध असल्याने कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्यावरच होती. यावर्षी सतत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातच स्टेट बँक ऑफ इंडिया कडून घेतलेले सुमारे ५० हजार रुपयांचे कर्ज, पुढील वर्षभराचा संसारखर्च आणि उत्पन्नाचा कोणताही आधार नसल्याने ते मानसिक तणावाखाली होते. या विवंचनेतूनच त्यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविले.

याप्रकरणी त्यांचे वडील अंबादास नामदेव काकड (वय ६८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किनगाव राजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेत पंचनामा केला. मृतदेहाचे शवविच्छेदन करून आज दि. १५ डिसेंबर रोजी सकाळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शांत, संयमी आणि मितभाषी स्वभावाच्या गजानन काकड यांच्या अकाली निधनाने ग्रामस्थ हळहळ व्यक्त करीत होते. त्यांच्या पश्चात सहा वर्षांचा मुलगा आणि नऊ वर्षांची मुलगी असा परिवार आहे. या घटनेचा पुढील तपास किनगाव राजा पोलीस ठाण्याचे बीट जमादार विष्णू मुंडे करीत आहेत.

Share This Article
Exit mobile version