– १५ जानेवारीला मतदान, १६ ला निकाल; आचारसंहिता लागू, ३ कोटी मतदारांचा फैसला!
मुंबई (धम्मप्रिया कांबळे) : महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणाऱ्या आणि सत्तासमीकरणे उलथवून टाकणाऱ्या २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल अखेर राज्य निवडणूक आयोगाने आज फुंकला. नगर, पुणे, मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये एकाच टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, दुसऱ्याच दिवशी १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. या घोषणेसोबतच संपूर्ण राज्यात तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, राजकीय व प्रशासकीय यंत्रणा निवडणूक मोडमध्ये गेली आहे. “आजपासून सर्व महापालिकांमध्ये आचारसंहित लागू आली आहे’, असे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जाहीर केले आहे. मतदान संपल्यानंतर कोणत्याही प्रकारचे एक्झिट पोल किंवा माध्यम सर्वेक्षण जाहीर करण्यास बंदी राहणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
निवडणूक प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांना २३ ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत ऑफलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत. ३१ डिसेंबर रोजी अर्जांची छाननी होईल, तर २ जानेवारी २०२६ ही अर्ज माघारीची अंतिम तारीख असेल. ३ जानेवारीला चिन्ह वाटप करून अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर अवघ्या बारा दिवसांचा प्रचार कालावधी मिळणार असून, १५ जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडेल. १६ जानेवारीला मतमोजणी होऊन राज्यातील सत्तासमीकरणांचे चित्र स्पष्ट होणार आहे.
असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम –
- अर्ज दाखल करण्याचा कालावधी – 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
- अर्जाची छाननी – 31 डिसेंबर
- उमेदवारी माघारीची मुदत – 2 जानेवारी 2026
- निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम यादी – 3 जानेवारी 2026
- मतदान – 15 जानेवारी 2026
- मतमोजणी – 16 जानेवारी 2026
या निवडणुकीत सुमारे तीन कोटी मतदार आपला हक्क बजावणार असून, मतदार यादी १ जुलै २०२५ रोजीची ग्राह्य धरण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सुमारे ४९ हजार मतदान केंद्रांवर जवळपास दोन लाख कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. काही ठिकाणी पूर्णतः महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रेही असणार आहेत. मतदान संपल्यानंतर कोणत्याही प्रकारचे एक्झिट पोल किंवा माध्यम सर्वेक्षण जाहीर करण्यास बंदी राहणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. प्रभाग रचनेबाबत बोलायचे झाल्यास, बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘एक प्रभाग – एक सदस्य’ ही पद्धत कायम ठेवण्यात आली आहे. मात्र उर्वरित २८ महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्यात आली असून, मतदारांना एकाच वेळी तीन ते पाच उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे. या बदलामुळे प्रचाराची रणनिती आणि पक्षीय गणिते पूर्णतः बदलण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीत उमेदवारांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले असून, प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास अर्ज केल्याचा पुरावा आणि हमीपत्र द्यावे लागणार आहे. निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधित उमेदवाराची निवड रद्द होणार आहे. तसेच मतदार यादीतील गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी आयोगाने कडक भूमिका घेतली असून, विशेषतः मुंबईत आढळलेल्या लाखो दुबार मतदार नोंदींबाबत तपास आणि हमीपत्राची प्रक्रिया राबवली जाणार आहे.
मतदारांच्या सोयीसाठी ‘मताधिकार’ मोबाईल ॲप सुरू करण्यात आले असून, त्याद्वारे नागरिकांना आपले नाव, प्रभाग आणि मतदार तपशील तपासता येणार आहेत. पारदर्शक, निष्पक्ष आणि सुरळीत निवडणूक प्रक्रिया राबवण्याचा निर्धार आयोगाने व्यक्त केला आहे. एकूणच, २९ महानगरपालिका निवडणुकांच्या घोषणेमुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे. १५ जानेवारीचा मतदान दिवस आणि १६ जानेवारीचा निकाल राज्याच्या राजकीय भवितव्याला नवी दिशा देणार, हे मात्र निश्चित आहे.

