पुणे, मुंबईसह २९ महापालिकांवर ‘सत्तासंघर्ष’!आज ४ वाजता ‘रणधुमाळी’ची घोषणा; ‘आचारसंहिते’चा ‘बॉम्ब’ तात्काळ पडणार!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

– २९ महानगरपालिकांसह ३२ जिल्हा परिषदांच्याही निवडणुकीचे बिगुल आजच वाजणार?; राज्याच्या राजकारणात भूकंप अटळ!

मुंबई (धम्मप्रिया कांबळे)- महाराष्ट्राच्या राजकारणात आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहे. मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील तब्बल २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल आज वाजण्याची दाट शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची जवळपास सर्व तयारी पूर्ण केली असून, आज दुपारी ४ वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत वेळापत्रकाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. कालच आयोगाने सर्व महापालिका आयुक्तांना सज्ज राहण्याचे आदेश दिले होते, ज्यामुळे आजपासूनच या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या घोषणेसोबतच, संबंधित महापालिका क्षेत्रांमध्ये तात्काळ आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे नवीन घोषणा, निर्णय आणि विकासकामांवर थेट निर्बंध येणार आहेत. आचारसंहिता लागू होताच, प्रशासन आणि राजकीय पक्षांच्या हालचाली वाढणार असून, निवडणूक प्रचाराला वेग येईल. राज्यातील राजकीय वातावरण आता पूर्णपणे तापण्याची चिन्हे असून, आगामी महापालिका निवडणुका अत्यंत चुरशीच्या ठरणार हे निश्चित आहे.

या निवडणुकीत राज्यातील २९ महत्त्वाच्या महानगरपालिकांचा समावेश आहे. अहिल्यानगर, बृहन्मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर आणि ठाणे यांसारख्या मोठ्या शहरांचा यात समावेश आहे. या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या आणि राजकीय महत्त्व असल्याने, राजकारणातील सर्व प्रमुख पक्षांनी या निवडणुकांकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. अनेक शहरांमध्ये सत्ता कोणाच्या हाती जाणार, यावर भविष्यातील राजकीय समीकरणे आणि युती-आघाड्या ठरण्याची शक्यता आहे. एकंदरीत, आज सायंकाळी ४ वाजता होणारी राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. निवडणूक रणधुमाळीला आजच अधिकृत आणि स्फोटक सुरुवात होते का, हे काही तासांतच स्पष्ट होईल!

 


ग्रामीण महाराष्ट्रातही ‘सत्ता’ बदलाचे वारे! ३२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही जाहीर होणार!

महापालिकांसोबतच, आयोगाच्या पत्रकार परिषदेत ३२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर होण्याची शक्यता आहे. बुलढाणा, धुळे, नाशिक, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, नागपूर अशा अनेक जिल्ह्यांचा यात समावेश आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका ग्रामीण भागातील राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या असल्याने, या निवडणुकांकडे ग्रामीण महाराष्ट्राचेही लक्ष लागले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सत्तांतराची शक्यता असल्याने ग्रामीण राजकारणही चांगलेच तापलेले आहे.

Share This Article
Exit mobile version