– देऊळगावराजात पाणी वापर संस्थांची १२ वी बैठक; सर्व अध्यक्षांना उपस्थितीचे निर्देश
– पाणी नियोजन, वितरण व शेतकऱ्यांच्या तक्रारींवर होणार सविस्तर चर्चा
– शेतकरी नेते शेणफडराव घुबे यांचे बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन
देऊळगावराजा (राजेंद्र घुबे) : खडकपूर्णा प्रकल्पांतर्गत कार्यरत असलेल्या पाणी वापर संस्थांसाठी निर्णायक ठरणारी १२ वी बैठक मंगळवार, १६ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता, खडकपूर्णा प्रकल्प विभाग, देऊळगाव राजा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक दुपारी १२ वाजता त्यांच्या कार्यालयात होणार असून, यामध्ये प्रकल्पाच्या पाणीवाटपाचा अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
या बैठकीस खडकपूर्णा प्रकल्पातील सर्व पाणी वापर संस्थांचे अध्यक्षांनी अनिवार्यपणे उपस्थित राहावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. चालू हंगामातील पाणी नियोजन, पाणी वितरणातील अडचणी, पाळीपद्धतीतील त्रुटी, शेतकऱ्यांच्या प्रलंबित तक्रारी तसेच आगामी काळातील उपाययोजनांवर या बैठकीत सखोल चर्चा होणार आहे. प्रकल्प क्षेत्रात पाणीटंचाई, अनियमित पाणीपुरवठा आणि व्यवस्थापनातील कमतरतेमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत असताना ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे पाणी वापर संस्थांचे अध्यक्षांनी शेतकऱ्यांच्या समस्या थेट मांडून ठोस भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, शेतकरी नेते शेणफडराव घुबे यांनीही या बैठकीला विशेष महत्त्व असल्याचे सांगत, पाणी वापर संस्थांचे प्रतिनिधी व शेतकरी यांनी सज्ज राहून पाणीहक्क, नियोजन व न्याय्य पाणीवाटपासाठी ठामपणे भूमिका मांडावी, असे आवाहन केले आहे. ही बैठक केवळ औपचारिक न राहता शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नांवर ठोस व परिणामकारक निर्णय देणारी ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

