सात दिवसांत तीन बळी; शेळगाव आटोळ परिसर अपघातांच्या छायेत!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-वाढते अपघात, रस्ते सुरक्षेअभावी गावावर शोककळा

ईसरूळ (भिकनराव भुतेकर) — शेळगाव आटोळ व परिसरात गेल्या सात दिवसांत घडलेल्या सलग तीन भीषण रस्ते अपघातांनी संपूर्ण परिसर हादरून गेला असून, तीन निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याने गावावर शोककळा पसरली आहे. अपघातांची वाढती मालिका, बेदरकार वाहनचालक आणि रस्ते सुरक्षेअभावी ग्रामस्थांमध्ये तीव्र अस्वस्थता व संताप व्यक्त होत आहे.

पहिली घटना ५ डिसेंबर रोजी जाफ्राबाद रोडवरील चौफुली येथे घडली. दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या भीषण धडकेत गणेश भिकनराव लाटे (देशमुख) (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबप्रमुख असलेल्या गणेश लाटे यांच्या पश्चात दोन मुले असून, अचानक झालेल्या या अपघाताने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दुसरी दुर्घटना १० डिसेंबर रोजी जालना जिल्ह्यातील टेम्भूर्णी येथे घडली. येथे ट्रॅक्टरच्या जोरदार धडकेत गोपाल रमेश मिसाळ (वय २६) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या वर्षभरापूर्वीच विवाह झालेल्या गोपाल यांच्या अपघाती मृत्यूने कुटुंबीय अक्षरशः कोलमडून गेले असून, संसाराची स्वप्ने अपघातात उद्ध्वस्त झाली आहेत. तिसरी आणि तितकीच हृदयद्रावक घटना १२ डिसेंबरच्या रात्री छत्रपती संभाजीनगर येथे घडली. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत प्रमोद धर्मा बोर्डे उर्फ माधु (वय ३४) यांचा मृत्यू झाला. संभाजीनगर येथे बँकेत कार्यरत असलेले प्रमोद बोर्डे हे सुशिक्षित व कर्तव्यदक्ष तरुण होते. तीन वर्षांपूर्वी विवाह झालेल्या प्रमोद यांना अपत्य नव्हते. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने पत्नी, नातेवाईक व मित्रपरिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या तीन अपघातांमुळे शेळगाव आटोळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, “सात दिवसांत तीन बळी” ही बाब ग्रामस्थांच्या मनात तीव्र अस्वस्थता निर्माण करणारी ठरत आहे. रस्त्यांची दुरवस्था, वेगमर्यादेचे उल्लंघन, वाहतूक नियंत्रणाचा अभाव तसेच अपघातप्रवण चौकांवर आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना न केल्यामुळेच अशा घटना घडत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Share This Article
Exit mobile version