– स्पेलिंग मिस्टेक, क्षेत्रफळ गडप; हजारो शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित — दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा विनायक सरनाईक यांचा इशारा!
चिखली (रंजना मोरे) – शासनाच्या ‘डिजिटल सुधारणा’ शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार होत्या; पण प्रत्यक्षात त्या शेतकऱ्यांच्या मानेवरच बसल्या! फार्मर आयडीतील तांत्रिक चुकांमुळे बुलढाणा जिल्ह्यातील, विशेषतः चिखली तालुक्यातील हजारो शेतकरी हेक्टरी १० हजार रुपयांच्या रब्बी अनुदानासह नुकसानभरपाईपासून थेट वंचित राहिले आहेत. चूक शेतकऱ्यांची नाही, तरी शिक्षा मात्र त्यांनाच! राज्यात अॅग्रीस्टॅक मोहीम राबवून शेतकऱ्यांना अकरा अंकी फार्मर आयडी देण्यात आला. आधारकार्डप्रमाणेच हा आयडी आता बंधनकारक करण्यात आला असून शासनाच्या सर्व योजनांचा लाभ याच आयडीवर अवलंबून आहे. मात्र याच फार्मर आयडीतील स्पेलिंग मिस्टेक, क्षेत्रफळातील तफावत, पोटखराब क्षेत्राची नोंद न होणे अशा गंभीर त्रुटींमुळे शेतकरी अक्षरशः अडकले आहेत.
आक्रमक मागण्या व इशारा : फार्मर आयडीमध्ये तातडीने ‘एडिट ऑप्शन’ उपलब्ध करून द्यावा, स्पेलिंग मिस्टेक व क्षेत्रफळ दुरुस्ती त्वरित करावी, आधी दुरुस्त केलेल्या आयडींना तात्काळ मान्यता द्यावी, सातबाऱ्याप्रमाणे क्षेत्रफळ फार्मर आयडीमध्ये समाविष्ट करावे, पोटखराब लागवडीखाली आणलेले क्षेत्र नोंदवावे आणि या तांत्रिक चुकांमुळे रखडलेली नुकसानभरपाई व अनुदान तातडीने अदा करावे, अशी ठाम मागणी सरनाईक यांनी मुख्यमंत्री, कृषी मंत्री आणि जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. ही चूक शेतकऱ्यांची नसून पोर्टलची आहे. तरीही शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. लवकरात लवकर सुधारणा करून न्याय न दिल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा कडक इशारा विनायक सरनाईक यांनी दिला आहे.

