परमहंस श्री तेजस्वी बाबा समाधीस्त!

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read

– लाखो भक्तांच्या अश्रूंचा महापूर; वरोडीत ‘जय जय’च्या गजराने आसमंत दुमदुमला, राजकीय दिग्गजांची उपस्थिती!

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – सिंदखेडराजा तालुक्यातील तीर्थक्षेत्र वरोडी येथे परमहंस श्री तेजस्वी महाराजांचा समाधी सोहळा आज, १४ नोव्हेंबर रोजी लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीत अत्यंत दुःखाश्रूंनी भिजलेल्या वातावरणात पार पडला. गुरुवर्यांनी केलेल्या मंगलमय मंत्रोच्चारात हा सोहळा डोळ्यासमोर पाहताना उपस्थित प्रत्येकाची डोळी डबडबली होती. काल, १३ नोव्हेंबर रोजी रात्री ९:३० वाजता परमहंस श्री तेजस्वी महाराजांनी वैकुंठगमन केले. ही बातमी वाऱ्याच्या वेगाने संपूर्ण बुलढाणा, अकोला, वाशिम आणि जळगाव या भागांत पसरताच, रात्रीपासूनच भक्तांचा महासागर वरोडीत दाखल होऊ लागला. दर्शनासाठी रात्रीपासून झालेली तुफान गर्दी आज दुपारी एक वाजेपर्यंत कायम होती.

लाखो भाविक दर्शनाच्या रांगेत असताना, अखेर दुपारी १ वाजता श्री श्री श्री १००८ हरिचैतन्य स्वामी महाराज, श्री पलसिध्द महास्वामी मठाचे मठाधिपती सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज, ह.भ.प. प्रकाश महाराज जंजाळ यांच्यासह सोपान महाराज गव्हाड, अमोलनंद स्वामी, प्रेमानंद महाराज देशमुख, निवृत्ती महाराज, ओम महाराज आदी गुरुवर्यांनी मंत्रोच्चारात समाधी सोहळा पार पाडला. यापूर्वी संस्थानच्या वतीने महाराजांना स्नान घालण्यात आले. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव, माजीमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अंतिम दर्शन घेतले. तसेच, संस्थानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण गारोळे, अध्यक्ष श्यामसुंदर जाजू, महाराजांचे बंधू जनार्दन गुंजकर, विश्वस्त काशिनाथ गारोळे, माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, सभापती अनिल तुपकर, माजी सभापती ह.भ.प. जगनमामा सहाने आदी मान्यवर उपस्थित होते. आज शेकडो वारकरी दिंड्या दाखल झाल्या होत्या. प्रत्येकाच्या मुखातून ‘जय जय रामकृष्ण हरी’ हा एकच नामस्मरणाचा जयघोष सुरू होता. समाधी सोहळा डोळ्यात पाणी आणून गेला, तरीही गुरुवर्यांचे अंतिम दर्शन व्हावे अशी सर्वांची इच्छा होती. मात्र, वेळेअभावी हजारो भाविकांनी समाधीवर डोके टेकवून आपल्या गुरूंविषयीची कृतज्ञता पाणावलेल्या डोळ्यांतून अश्रू ढाळीत व्यक्त केली.


“वरोडी हे आचार, विचार आणि संस्कृती देणारे तीर्थक्षेत्र आहे. महाराज कीर्तिरूपाने याच ठिकाणी आहेत. त्यांच्या आशीर्वादाची शिदोरी नेहमी स्मरणात राहील.” – प्रतापराव जाधव, (केंद्रीय मंत्री)

“परमहंस श्री तेजस्वी महाराज ही साधीसुधी व्यक्ती नव्हती, तर जन्मापासून त्यांच्या अंगी विभूती होती. जोपर्यंत चंद्र, सूर्य, तारे आहेत, तोपर्यंत त्यांचे नाव अजरामर राहील.” – डॉ. राजेंद्र शिंगणे, (माजीमंत्री)


यावेळी माजीमंत्री डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यासह सर्वच गुरुवर्यांनी महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली. महाराजांनी देह ठेवला असला तरी ते या परिसरात वास करून वास्तव्यात आहेत, अशी दृढ भावना प्रत्येक भक्ताच्या मनात यावेळी पाहायला मिळाली.

वरोडीच्या अध्यात्मिक तेजाचा अस्त; परमहंस श्री तेजस्वी महाराज यांचे वैकुंठ गमन!

Share This Article
Exit mobile version