वरोडीच्या अध्यात्मिक तेजाचा अस्त; परमहंस श्री तेजस्वी महाराज यांचे वैकुंठ गमन!

breakingmah Add a Comment 3 Min Read
3 Min Read

-९० वर्षांचे तपस्वी जीवन संपले; श्रद्धा, सेवा व चमत्कारांनी लाखो भक्तांचे जीवन उजळले!

साखरखेर्डा (अशोक इंगळे)- साखरखेर्डा जवळच्या असलेल्या तीर्थक्षेत्र वरोडी येथील अध्यात्मिक विश्वाचा आधारस्तंभ असलेले परमहंस श्री तेजस्वी महाराज यांनी वयाच्या ९० व्या वर्षी आज, शुक्रवार दिनांक १३ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता वैकुंठ गमन केले. त्यांच्या देहावसानाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून हजारो भक्त शोकसागरात बुडाले आहेत. समाधीचा कार्यक्रम १४ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता ठेवण्यात आला आहे .

गेल्या अनेक दशकांपासून वरोडी हे केवळ एक गाव न राहता श्रद्धा, भक्ती व अध्यात्माचे केंद्र बनले होते. त्यामागे परमहंस श्री तेजस्वी महाराज यांचे तपस्वी, त्यागमय व लोककल्याणकारी जीवन कारणीभूत होते. त्यांच्या कृपाशिर्वादाने अनेकांचे दुःख दूर झाले, आजार बरे झाले, संसार मार्गी लागले, अशी श्रद्धा भाविकांमध्ये दृढ होती. नुकताच २८ नोव्हेंबर रोजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला होता. या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. विशेष म्हणजे गेल्या ३८ वर्षांपासून अखंडपणे हा जन्मोत्सव वरोडी येथे साजरा केला जात असून तो परिसरातील सर्वात मोठ्या धार्मिक उत्सवांपैकी एक मानला जातो.

जन्मोत्सवानंतर अचानक महाराजांची प्रकृती खालावू लागली. त्यांचे नातू डॉ. गुंजकर हे अहोरात्र महाराजांच्या सेवेत होते. सातत्याने वैद्यकीय उपचार सुरू असतानाही वयोमानानुसार अवयवांनी साथ देणे कमी केले. ३० नोव्हेंबरपासून तब्येत अधिकच चिंताजनक होत गेल्याने वरोडीत भक्तांचा महासागर लोटू लागला. महाराजांना दीर्घायुष्य लाभावे, यासाठी हरिनामाचा अखंड गजर, भजन-कीर्तन, प्रवचन व जागर रात्रंदिवस सुरू होता. संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. मात्र नियतीपुढे कुणाचेच चालत नाही. अखेर आज दि.१३ डिसेंबररोजी रात्री ९.३० वाजता महाराजांनी देह ठेवला. या वेळी त्यांचे बंधू व माजी सरपंच जनार्दन गुंजकर, कुटुंबातील सदस्य, दोन बहिणी, संस्थानचे अध्यक्ष लक्ष्मण गारोळे, तसेच शेकडो भाविक भक्त उपस्थित होते. त्यांच्या वैकुंठ गमनाची वार्ता साखरखेर्डा, मेहकर, शेंदुर्जन व परिसरात पसरताच हजारो भाविकांनी वरोडीकडे धाव घेतली.
आज वरोडीतील प्रत्येक रस्ता, प्रत्येक घर शोकमग्न आहे. अनेक भक्तांच्या डोळ्यांत अश्रू तर ओठांवर महाराजांचे स्मरण आहे. “देह गेला, पण तेजस्वी महाराज श्रद्धेच्या रूपाने अजरामर झाले” अशा भावना सर्वत्र व्यक्त होत आहेत. परमहंस श्री तेजस्वी महाराज यांचे जीवन हे साधेपणा, सेवा, करुणा व भक्तीचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांच्या जाण्याने एक युग संपले असले, तरी त्यांच्या शिकवणी व कृपाछायेमुळे वरोडीचे अध्यात्मिक तेज सदैव उजळत राहील, यात शंका नाही.

Share This Article
Exit mobile version