अल्पवयीन मुलीचे अपहरण सहा महिन्यांनंतर उघड; आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-तपासातील दिरंगाईचा आरोप; पीडित युवती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड
-लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचा आरोप; पुणे जिल्ह्यातून मुलगी ताब्यात

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेंदुर्जन येथील  विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार सहा महिन्यांनंतर उघडकीस आला आहे. या प्रकरणातील पीडित युवतीचा शोध घेण्यात अखेर साखरखेर्डा पोलिसांना यश आले असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे. दरम्यान, तपासातील दिरंगाईमुळे पीडित मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, शेंदुर्जन येथील सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून गणेश विठ्ठल वडुळे, रा. शेंदुर्जन याने २३ जून २०२५ रोजी घरात कोणी नसल्याची संधी साधून पळवून नेले. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी २५ जून रोजी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास दुय्यम ठाणेदार रविंद्र सानप यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

दरम्यान, पीडित मुलीच्या शेतमजूर वडिलांनी आपल्या मुलीचा शोध घेण्यासाठी वारंवार तपास अधिकाऱ्यांकडे विनवणी केली. मात्र, अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. तपासात प्रगती होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर ठाणेदार गजानन करेवाड यांनी हा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल रामदास वैराळ यांच्या पथकाने पुणे जिल्ह्यातील रांजणगाव परिसरात शोधमोहीम राबवली.

दि. १२ डिसेंबर रोजी दिवसभर शोध घेतल्यानंतर मध्यरात्री रांजणगाव–करडे रोडलगत असलेल्या एका वस्तीतून आरोपी व पीडित मुलीला ताब्यात घेण्यात आले. सहा महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा छडा लावण्यात यश आल्याने ठाणेदार गजानन करेवाड तसेच पोलीस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पीडित मुलीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले असून, आरोपीस न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणात दुय्यम ठाणेदारांच्या कथित दिरंगाईवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पीडित मुलीच्या पित्याने सांगितले की, तपास अधिकाऱ्यांना मुलगी कुठे असू शकते याची माहिती देऊनही वेळेत कारवाई करण्यात आली नाही. योग्य वेळी तपास झाला असता तर मुलगी लवकर सापडली असती आणि आज तिच्या पोटात चार महिन्यांचा गर्भ राहिला नसता, असा आरोप त्यांनी केला आहे. या दिरंगाईची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Share This Article
Exit mobile version