सिंदखेडराजा तालुका शिक्षक पतसंस्थेच्या पदाधिकारी निवडीत साखरखेर्ड्याचे वर्चस्व!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-सिंदखेडराजा तालुका शिक्षक पतसंस्थेच्या निवडणुकीत साखरखेर्ड्याचे वर्चस्व; तीन प्रमुख पदांवर निवड, अध्यक्षपदी अशोक नागरे; उपाध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष साखरखेर्ड्यातील शिक्षकांकडे

साखरखेर्डा (अशोक इंगळे)- सिंदखेडराजा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकारी निवडणुकीत साखरखेर्डा येथील शिक्षकांनी वर्चस्व सिद्ध केले आहे. आज १२ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदासह उपाध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष अशी चारही प्रमुख पदे निवडण्यात आली असून, यामध्ये साखरखेर्ड्याला तब्बल तीन पदे मिळाली आहेत. या निवडीमुळे साखरखेर्डा परिसरातील शिक्षक व नागरिकांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

सिंदखेडराजा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष नंदकिशोर शिंगणे यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर अध्यक्ष व इतर पदांसाठी सिंदखेडराजा पंचायत समितीच्या सभागृहात संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सर्वानुमते अशोक नागरे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून साखरखेर्डा येथील बाळू राजाराम पऱ्हाड, सचिव म्हणून रमेश जैवळ तर कोषाध्यक्षपदी सुभाष गवई यांची अविरोध निवड करण्यात आली. यावेळी संचालक मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते.

निवड जाहीर होताच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा हारतुरे व शाल देऊन सत्कार करण्यात आला. दरवर्षी अध्यक्ष व इतर पदाधिकारी बदलून विविध घटकांना प्रतिनिधित्व देण्याची परंपरा या पतसंस्थेत राबवली जात असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

दरम्यान, या निवडणुकीनंतर काही शिक्षक व सामाजिक स्तरावर चर्चेला उधाण आले आहे. निवड प्रक्रियेदरम्यान लोकनेते, ओबीसी समाजाचे आधारस्तंभ स्व. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन न झाल्याबाबत काहींनी नाराजी व्यक्त केली असून, यासंदर्भात सोशल मीडियावरही संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नवनिर्वाचित अध्यक्ष अशोक नागरे हे अनुभवी व समाजात मानाचे स्थान असलेले नेतृत्व असल्याने, या बाबीकडे त्यांनी सकारात्मक दृष्टीने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा काही शिक्षकांकडून व्यक्त होत आहे.

फोटो : नवनिर्वाचित अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना

Share This Article
Exit mobile version