निवडणुका डोक्यावर, सत्ता धावपळीत! सोमवारी महापालिका निवडणुकीची घोषणा शक्य!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-हिवाळी अधिवेशन रविवारी संपताच राजकारण तापणार; आचारसंहिता लागू होऊन शहरी भाग ठप्प, पक्ष-नेते उडवणार धुरळा!

नागपूर/बुलढाणा (बाळू वानखेडे) – नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा पडदा रविवारी खाली पडताच राज्यात राजकारणाला अक्षरशः ताप चढणार आहे. महापालिका निवडणुकांची घोषणा सोमवारीच होण्याची जोरदार शक्यता व्यक्त होत असून, आपल्या राजकीय नशिबाची गणितं लावणाऱ्या सर्व पक्षांत एकच खळबळ उडाली आहे. निवडणुका जाहीर होताच आचारसंहिता लागू होणार असल्याने शहरी भागातील प्रशासन जवळपास ठप्प पडण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.

नगरी क्षेत्रात नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर २१ डिसेंबरपर्यंत आचारसंहिता आधीपासूनच लागू आहे. त्यामुळे अनेक विकासकामांना आधीच गंडांतर आले आहे. आता महापालिका निवडणुकांची घोषणा झाली तर उरलेली शहरी यंत्रणाही पूर्ण गोठणार, यात शंका नाही. दरम्यान, निवडणुका जेमतेम डोक्यावर येताच राजकीय पक्षांनी धडाधड मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गल्लीतल्या भिंतीपासून ते सोशल मीडियाच्या लाईव्हपर्यंत सर्वत्र प्रचाराची वाजंत्री सुरू आहे. इच्छुक उमेदवारांनी तर घराघरांत संपर्क, पायघड्या, भेटीगाठी आणि गटनेत्यांच्या दारात रात्रंदिवस टापा ठोकण्याचा सपाटा लावला आहे. तिकीटासाठीची धडपड इतकी प्रखर झाली आहे की काही नेत्यांच्या कार्यालयाबाहेर उमेदवारांनी अक्षरशः शिबिरेच भरवली आहेत. सत्ताधाऱ्यांवर विरोधकांचा हल्ला अधिवेशनात आधीच वाढलेला असताना, निवडणूक जाहीर होताच हा संघर्ष आणखी धगधगणार आहे. शहरी भागात आचारसंहितेच्या मर्यादांमुळे नवीन कामांना हिरवा कंदील मिळणे अशक्य, तर निधीवाटप आणि अधिकारी बदल या निर्णयांवर गंडांतर येणार हे स्पष्ट आहे. ग्रामीण भागावर याचा तातडीचा परिणाम नसला तरी शहरांमधील प्रलंबित प्रकल्प, नागरिकांच्या तक्रारी आणि प्रशासकीय हालचालींना मोठा ब्रेक बसणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाची घोषणा ही राज्यातील सत्तासमीकरणांना नव्याने हालचाल देणारी ठरणार आहे. आता पुढील ४८ तास राज्याच्या राजकारणाचा दिशा-निर्देशक ठरणार आहेत. अधिवेशन संपताच निवडणूक जाहीर झाली तर उमेदवारीचे तगडे दावे, गटबाजीचे नवे अध्याय, आणि सत्ता मिळवण्यासाठीची आक्रमक धडपड एका नव्या टप्प्यात प्रवेश करणार आहे. कंबर कसून उभे असलेले राजकीय पक्ष रणांगणात उतरण्यास सज्ज झाले असून, राज्यभराची नजर आता फक्त एकाच गोष्टीवर खिळली आहे, निवडणूक आयोग सोमवारी काय जाहीर करतो?

Share This Article
Exit mobile version