– ५ क्विंटलची जाचक अट मोडीत; आ. मनोज कायंदे यांच्या पाठपुराव्याला यश, आता २३ क्विंटलपर्यंत खरेदी होणार!
नागपूर/सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – विधानभवनात काल ‘बळीराजा’चा कडकडीत विजय झाला आहे. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे तडफदार आमदार मनोज कायंदे यांच्या आक्रमक मागणीमुळे राज्य सरकारने कापूस खरेदीच्या जाचक नियमांना अखेर मूठमाती दिली आहे. ‘कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (CCI) मार्फत केली जाणारी कापूस खरेदीची मर्यादा प्रति एकर ५ क्विंटलवरून थेट २३ क्विंटलपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
शेतकऱ्यांचे प्रति एकरी उत्पादन अधिक असताना, केंद्र सरकारच्या ‘कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ (CCI) मार्फत केवळ ५ क्विंटल प्रति एकर कापूस खरेदीची मर्यादा लादण्यात आली होती. यामुळे लाखो शेतकऱ्यांचा अतिरिक्त कापूस विकला जात नव्हता, ज्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. या अन्यायी नियमाविरुद्ध आवाज उठवत, आ. मनोज कायंदे यांनी थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्याची मागणी केली. काल पार पडलेल्या या बैठकीत आ. कायंदे यांनी शेतकऱ्यांची बाजू अत्यंत जोरकसपणे मांडली. “शेतकऱ्यांचे उत्पादन जर जास्त असेल, तर त्यांना विकण्याचा अधिकार आहे. सरकारने त्यांच्या अडचणीवर तत्काळ तोडगा काढलाच पाहिजे,” अशी त्यांनी ठाम भूमिका घेतली. आमदार कायंदे यांच्या दबावानंतर आणि समस्येच्या गांभीर्यावर सविस्तर चर्चा झाल्यावर, सरकारने अखेर शेतकऱ्यांपुढे मान झुकवली! कापूस खरेदीची मर्यादा ५ क्विंटलवरून थेट २३ क्विंटल प्रति एकर पर्यंत वाढवण्याचा ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आता खरेदी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि सुरळीतता येणार असल्याचे आ. मनोज कायंदे यांनी सांगितले.

