जलजीवन योजनेचा बट्ट्याबोळ! अनेक कामे निधीच्या प्रतिक्षेत!

admin Add a Comment 3 Min Read
3 Min Read
  • मेहकर-लोणार मध्ये जलजीवनची १५० पैकी फक्त ११ कामे; आमदार सिद्धार्थ खरात यांचा विधानसभेत झंझावाती हल्ला!

बुलढाणा/नागपूर (बाळू वानखडे) – मेहकर–लोणार मतदारसंघातील पाणीपुरवठा, तीर्थक्षेत्र विकास, गृहनिर्माण, वारसा संवर्धन आणि शहर विकासाच्या महत्त्वाच्या कामांना निधीअभावी गती मिळत नसल्याचा मुद्दा काल १० डिसेंबर रोजी विधानसभेत ठळकपणे समोर आला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी प्रशासनाच्या निष्क्रीय कारभारावर ताशेरे ओढत सरकारला कठोर शब्दांत जाब विचारला. जलजीवन योजनेतील गंभीर कुचराई उघड करत त्यांनी ठणकावले—”जलजीवन योजनेचा पुरता बट्ट्याबोळ केला आहे”. जलजीवन मिशन अंतर्गत मेहकर विधानसभा मतदारसंघात १५० पैकी केवळ ११ कामे पूर्ण झाल्याचे जळजळीत वास्तवही त्यांनी विधानसभेत उजागर केले.

सभागृहात मांडलेली आकडेवारी धक्कादायक होती. संपूर्ण मतदारसंघातील जलजीवन योजनेतील १५० पैकी केवळ ११ कामे पूर्ण, तर उर्वरित कामे महिनोमहीने रखडलेली. मेहकरमध्ये ५२ पैकी ६, तर लोणारमध्ये ६४ पैकी फक्त ५ कामे मार्गी लागल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. निधीअभावी कंत्राटदारांनी काम सोडले, अभियंते बदलले; पण परिस्थिती जसंच्या तशीच राहिली. नागरिकांना आजही स्वच्छ पाण्यासाठी दररोज वणवण करावी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. तीर्थक्षेत्र विकासाच्या संदर्भातही त्यांनी सरकारला धारेवर धरले. नरसिंह मंदिर, ओलांडेश्वर आणि शारंगधर बालाजी मंदिर विकासासाठी १०० ते १५० कोटींची मागणी करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी तत्त्वतः मान्यता दिली असली, तरी प्रत्यक्षात निधी शून्य, असा त्यांनी गंभीर आरोप केला. अमृत–२ प्रकल्पांतर्गत मेहकर शहरातील पाणीपुरवठ्याची समस्या अधिकच गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले. नगरपरिषदेकडे १४.६५ कोटींचा स्वहिस्सा उपलब्ध नसल्याने प्रकल्प पुढे सरकलेला नाही. हा आर्थिक भार शासनाने उचलावा, अशी त्यांनी मागणी केली असून उपमुख्यमंत्र्यांनी यावर तत्त्वतः सहमती दर्शवल्याचेही त्यांनी सांगितले. आरोग्य आणि वारसा संवर्धनाच्या कामांबाबतही निधीअभावी अडथळे कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ४ शादीखाने बळकटीकरणासाठी लागणारे २ कोटी उपलब्ध न झाल्याने ही कामे थांबली आहेत. पंचपीर बाबा दर्गा परिसर सुशोभीकरणासाठी मागितलेले १० कोटी आजही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. लोणारच्या जागतिक वारसा स्थळाबाबत तर परिस्थिती अधिकच गंभीर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. येथील एसटीपी वर्षानुवर्षे बंद असून, अप्रक्रियित सांडपाण्यामुळे लोणार सरोवराचे अस्तित्व धोक्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले. गृहनिर्माण क्षेत्रातही परिस्थिती चिंताजनक आहे. पीएम आवास योजनेतील घरकुले मोठ्या प्रमाणात रखडली असून, मेहकरमध्ये ५३५, तर लोणारमध्ये सुमारे २०० घरांची प्रतिक्षा अजूनही कायम आहे. रस्ते, वीज आणि पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी स्वतंत्र निधी न मिळाल्याने नागरिकांचे हाल वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. “मी वारंवार पत्रव्यवहार केला, पाठपुरावा केला; पण सरकारने दखल घेतली नाही. निधीअभावी सर्व प्रकल्प अधांतरी पडलेले आहेत. राज्याने तातडीने निर्णय घ्यावेत,” अशी त्यांनी विधानसभेत ठाम मागणी केली.
त्यांच्या या झंझावाती भूमिकेमुळे सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. मेहकर–लोणार मतदारसंघातील रखडलेले प्रकल्प, ढासळलेली पायाभूत व्यवस्था आणि वाढत्या नागरिक समस्यांच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी आता अधिक तीव्र होत आहे.

Share This Article
Exit mobile version