तांदुळवाडीमध्ये मोठी घरफोडी!

admin Add a Comment 2 Min Read
2 Min Read

-६ लाख १३ हजारांचा ऐवज लंपास; साखरखेर्डा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ!

साखरखेर्डा (वार्ताहर) – साखरखेर्डा आणि शिंदी येथे सुरू असलेल्या घरफोड्यांच्या मालिकेनंतर आता तांदुळवाडी येथेही चोरट्यांनी धुमाकूळ घालत ४ डिसेंबर रोजी रात्री झालेल्या मोठ्या घरफोडीत तब्बल ६ लाख १३ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील तांदुळवाडी येथे अंकुश शालीग्राम आकाळ (मॅनेजर, सेंट्रल बँक चिखली) यांच्या घरात ४ डिसेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी–कोंडा आणि कुलूप तोडून प्रवेश केला. हा प्रकार शालीग्राम आकाळ यांच्या लक्षात ५ डिसेंबर रोजी आला. त्या दिवशी ते भोरसा–भोरसी येथे चुलत बहिणीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. किराणा सामान आणि वांगी घेण्यासाठी साखरखेर्डा येथे आले असता पैसे अपुरे पडल्याने ते परत घरी गेले. तेव्हा घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश करताच सर्व सामान अस्ताव्यस्त असल्याचे दिसून आले. पेटी उघडून पाहिल्यावर त्यातील ४० हजार रुपये रोख गायब असल्याचे समजले. दुसऱ्या खोलीतही घरातील वस्तू विस्कळीत अवस्थेत होत्या. त्यांनी ही माहिती अंकुश आकाळ यांना दिली. त्यानंतर आकाळ कुटुंबीयांसह त्वरित तांदुळवाडीत पोहोचले. आतल्या बेडरूममध्ये ठेवलेल्या लोखंडी पेटीतून चांदीचे ५ तोळे दागिने (किंमत – ५ हजार रुपये), लहान मुलांचे दागिने १० हजार रुपये, सौभाग्यवती पोत ५ तोळे (किंमत – ५ लाख ५५ हजार रुपये), रोख ३ हजार रुपये असा एकूण ६ लाख १३ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे उघड झाले. या प्रकरणी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. “साखरखेर्डा पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास करून चोरट्यांचा त्वरित शोध घ्यावा,” अशी मागणी अंकुश शालीग्राम आकाळ यांनी केली आहे.

Share This Article
Exit mobile version