-‘मागणी रास्त, तर अर्ज कुठे आहेत?’; शेतकरी नेते शेणफडराव घुबे यांचा जळजळीत सवाल!
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) – शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या लोकप्रतिनिधींना आता जनतेनेच आरसा दाखवला आहे! खडकपूर्णा धरणातून तातडीने पाटांद्वारे पाणी सोडण्याची मागणी करणारे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांना शेतकरी नेते शेणफडराव घुबे यांनी थेट आव्हान देत, ‘तुमची मागणी खरी असेल तर अर्ज दाखवा!’ असा जाब विचारला आहे. नुसत्या घोषणाबाजीवर चालणारे राजकारण आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर येऊन धडकले आहे.
आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी तातडीने पाणी सोडण्याची मागणी केल्यानंतर शेतकरी नेते शेणफडराव घुबे यांनी त्यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. घुबे म्हणतात, “डॉ. खेडेकर साहेब, पाणी सोडण्याची तुमची मागणी रास्त आहे, पण ज्यांच्यासाठी तुम्ही ही मागणी केली, त्या शेतकऱ्यांनी अजून पाणी मागणीचे अर्जच प्रकल्पाकडे सादर केले नाहीत, त्याचे काय?” याचा अर्थ, आमदार केवळ देखावा करत आहेत, असा घुबेंचा स्पष्ट आरोप आहे. घुबे यांनी आमदारांना आता तात्पुरत्या मागणीऐवजी कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आव्हान दिले आहे. “तुम्हाला खरंच शेतकऱ्यांचे हित साधायचे असेल, तर खडकपूर्णा प्रकल्पाद्वारे उपसा जलसिंचन योजना टप्पा १ ते ४ व डाव्या-उजव्या कालव्याचे प्रवाही पाणी कायमस्वरूपी फुकट सोडा, अशी मागणी शासनाकडे करा!” अशी त्यांची मागणी आहे. यामुळे दरवर्षी मागणी करण्याची गरज पडणार नाही आणि शेतकऱ्यांचा प्रश्न कायमचा मिटेल, असे घुबेंचे मत आहे.
─────────────────────────────────────────────────────────────────────────────
‘आम्ही निवडून देतो, बारी देणार नाही!’
माजी आमदारांच्या राजकीय दिखाऊगिरीवर घुबे यांनी अत्यंत खोचक शब्दांत टीका केली आहे. ते म्हणतात, “फक्त पाणी सुटल्यावर आपल्याला शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन बारी (सहल) द्यायची पाळी येऊ नये म्हणजे झालं! कारण आम्ही तुम्हाला निवडून देतो ना!” निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीने घोषणाबाजीऐवजी धोरणात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा त्यांची मागणी केवळ पोकळ बडबड ठरेल, असा रोखठोक इशारा शेतकरी नेते शेणफडराव घुबे यांनी दिला आहे.

