साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालयाला वेग; माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या पुढाकारामुळे पुन्हा सुरू झाली हालचाल

admin 3 Min Read
3 Min Read

-प्रशासकीय हालचालींना मिळाली नवी चालना

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – साखरखेर्डा येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे, अशी स्थानिकांची वर्षानुवर्षांची मागणी होती. रुग्णालयाची मोठी इमारत चार वर्षांपूर्वी तयार झाली; पण उद्घाटन न झाल्याने ती बंदच राहिली. नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्याने माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी हा मुद्दा पुन्हा एकदा शासनापर्यंत पोहोचवला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे आज जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्यासह अधिकाऱ्यांनी रुग्णालयाची पाहणी केली.

साखरखेर्डा आणि आसपास मिळून साधारण २५ हजार लोकसंख्या आहे. त्यात ३५ गावे या भागाशी जोडलेली आहेत. सध्या येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे; परंतु दररोज ३०० ते ३५० रुग्ण येतात. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो. म्हणूनच पूर्ण सुसज्ज ग्रामीण रुग्णालयाची गरज आज अधिक तीव्रतेने जाणवत आहे.

या रुग्णालयाची मागणी स्थानिक नेते व माजी सरपंच रविंद्र पाटील यांनी अनेक वर्षांपूर्वी शासनाकडे केली होती. त्यानंतर विविध वेळा हा मुद्दा पुढे आला, थोडा मागे पडला; पण २०१४ मध्ये आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी या बाबतीत ठाम भूमिका घेतली. त्यांनी तत्कालीन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून १४ कोटी ९५ लाखांचा निधी मिळवला आणि कामाला सुरुवात झाली.

रुग्णालयाची इमारत सुंदर उभी राहिली; तसेच डॉक्टर आणि कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थानांसाठीही ३ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर झाला. काम पूर्ण होऊन चार वर्षे उलटली तरी रुग्णालय सुरू झाले नाही. शेवटी नागरिकांनी ही समस्या थेट डॉ. खेडेकर यांच्याकडे मांडली. त्यांनी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेऊन ग्रामीण रुग्णालयाची गरज तपशीलवार सांगितली. गर्भवती महिलांना प्रसूती, सोनोग्राफीसाठी चिखली किंवा बुलढाणा येथे जावे लागते. रात्रीच्या वेळी वाहतूक नसल्याने धोक्याची वेळ येते. लहान मुलांना वेळीच उपचार मिळत नाहीत. या सर्व अडचणी त्यांनी समोर मांडल्या.

आरोग्यमंत्री आबिटकर यांनी तात्काळ दखल घेत आजच अधिकाऱ्यांची पाहणी पथक साखरखेर्डा येथे पाठवले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बिराजदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता जे. एन. काळे, महावितरणचे मुख्य अभियंता मंगेश पागोरे यांनी संपूर्ण रुग्णालय पाहून आवश्यक मनुष्यबळ, अग्निशमन व्यवस्था आणि सुरूवातीसाठी गरजेच्या गोष्टींचा आढावा घेतला. श्री. पलसिद्ध कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक अर्जुन काटे यांनी बांधकामाची संपूर्ण माहिती दिली.

या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबूराव मोरे, युवासेना तालुका प्रमुख संदीप मगर, संचालक दिलीप बेंडमाळी, ग्रामपंचायत सदस्य संदीप खिल्लारे, बबलू जाधव, माजी उपसरपंच रफीक तांबोळी, चरणसिंग राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते. या पाहणीमुळे ग्रामीण रुग्णालय सुरू होण्याची आशा पुन्हा जागी झाली आहे. नागरिकांत आता दिलासा आणि अपेक्षेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share This Article
Exit mobile version