– मतदारयादी अंतिम करण्यासाठी मुदतवाढ; २९ महापालिका आणि १२ जिल्हा परिषद निवडणुकांचा एकत्र कार्यक्रमाची प्राथमिक तपासणी; अधिवेशनानंतर निवडणूक जाहीर होण्याची शक्यता!
बुलढाणा/मुंबई (बाळू वानखेडे) – नगर परिषद आणि नगर पालिका निवडणुका पार पडल्याने राज्यात आता महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने हालचाली वेगवान केल्या असून, मतदारयादी अंतिम करण्यासाठी अतिरिक्त मुदत देण्यात आली आहे. त्याचवेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत महत्त्वाची अपडेट पुढे आली आहे. राज्यातील २९ महापालिका निवडणुका नेमक्या कधी जाहीर होतील, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आठवडाभर चालणारे विधिमंडळ अधिवेशन संपल्यानंतर महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आयोगाने तीन टप्प्यांचा आराखडा केला होता. पहिल्या टप्प्यात नगर परिषद–नगर पालिका निवडणुका झाल्या. दुसऱ्या टप्प्यात ३२ जिल्हा परिषद व पंचायत समित्या, आणि तिसऱ्या टप्प्यात २९ महापालिकांच्या निवडणुका घेण्याची तयारी होती. तथापि, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न न्यायालयापर्यंत गेल्याने निवडणुकीचे नियोजन बदलले. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा लागू करण्याचे निर्देश केल्यानंतर आयोगाला नव्याने योजना आखावी लागली. आता २९ महापालिका आणि १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका एकाचवेळी घेण्याचा पर्याय तपासला जात आहे. आवश्यक मनुष्यबळ, निवडणूक यंत्रणा आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊनच अंतिम निर्णय जाहीर होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली होती. राज्याच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांना आता ‘डबल बार’ लढतीची कवायत सुरू झाली असून पुढील काही दिवसांत निवडणूक जाहीरनाम्याचा निर्णय स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

