– थंडी, अस्वल-बिबट्यांचा धोका!; शेतकऱ्यांचे महावितरणवर हल्लाबोल; विनायक सरनाईकांच्या नेतृत्वाखाली आंदोलन!
चिखली (रंजना मोरे) – “फक्त वीजपुरवठा नाही… आमच्या जीवाचा प्रश्न आहे!” असे स्पष्ट शब्दांत संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणविरोधात आवाज उठवला. जंगलपट्टीतील सोमठाणा, दिवठाणा, पेठ, बेलदरी येथील शेतकऱ्यांना रात्री १२ वाजता कृषी वीजपुरवठा दिल्याने कडाक्याच्या थंडीत आणि वन्य प्राण्यांच्या धोक्यात पिकांना पाणी द्यावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर धडक देत, क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वात दिवसा वीजपुरवठ्याची आक्रमक मागणी केली.
शेतकऱ्यांच्या आक्रमक पवित्र्याने दडपणाखाली सहाय्यक अभियंता शिराळे यांनी तोडगा काढण्याची ग्वाही दिली. त्यानंतर आजपासून सकाळचा वीजपुरवठा सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र ही फक्त सुरुवात असल्याचा पलटवार सरनाईकांनी केला. “हिवाळी अधिवेशनात हा आवाज ऐकू येईल… दिवसा वीज मिळायलाच हवी,” असा इशारा देत त्यांनी संघर्षाची लढाई सुरू असल्याचे स्पष्ट केले.
जंगल शिवार, बिबट्याचा दबा, अस्वलांचा वावर आणि थंडीचा कडाका… या सगळ्यांच्या छायेत शेतकरी रात्री पाणी देत पिक वाचवत आहेत. हिवाळी पिकांवर रात्रीचे सिंचन अनिवार्य असले, तरी जीवाचा धोका अधिक जड ठरत आहे. “वीज दिली तर दिवसा द्या… रात्रीचा अंधार आम्हाला माहीत आहे,” असा स्पष्ट संदेश देत शेतकऱ्यांनी महावितरणवर हल्लाबोल केला. या आंदोलनात क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे संतोष शेळके, दत्तात्रय मोरे, विजयसिंग मोरे, गणेश मोरे, औचितराव वाघमारे, ज्ञानेश्वर जाधव, सिद्धेश्वर मोरे, धनंजय मोरे, किरण मोरे, लालसिंग मोरे, विलास वसू, उमेश इंगळे, मंगेश मोरे, सुमंथा मोरे, ओंकार शेळके, सरपंच विष्णु शेळके यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

