वडगाव घेनंदची शान! शरदचंद्र पवार विद्यालय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत अव्वल

admin 2 Min Read
2 Min Read

– तिन्ही विभागांना पराभूत करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब; सहा खेळाडू राष्ट्रीय सिलेक्शनसाठी निवड

आळंदी (अर्जुन मेदनकर) : कबड्डीच्या पटांगणावर दमदार खेळाची छाप सोडत श्री. शरदचंद्र पवार विद्यालय, वडगाव घेनंद (पुणे विभाग) या शाळेने राज्यस्तरावर अभूतपूर्व यशाची नोंद केली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या.

या स्पर्धेत वडगाव घेनंद विद्यालयाच्या संघाने छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि सातारा या विभागांवर सरस ठरून अंतिम विजेतेपदावर आपला ठसा उमटवला. विजयाच्या या दमदार मालिकेने पुणे विभागाचा दबदबा संपूर्ण मैदानावर दिसून आला. आता संघातील सहा खेळाडूंनी आणखी एक मोठी मजल मारत विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संभाव्य संघ निवडीमध्ये स्थान मिळवले आहे. या खेळाडूंमध्ये कु. आराध्या दौंडकर, कु. तनया बवले, कु. तेजस्वी झोडगे, कु. इशिका बवले, कु. ज्ञानेश्वरी बवले आणि कु. कादंबरी घेनंद यांचा समावेश आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माऊली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी सभापती रमेश नारायणराव पवार, उद्योजक ऋषिकेश पवार, सचिव व माजी मुख्याध्यापक अंकुश सांडभोर, मुख्याध्यापक दिलीप करंडे, क्रीडा शिक्षक बाप्पू साकोरे, शिवेकर सर, लाड सर, विलास नितनवरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विजेत्या खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा दिल्या. स्थानिक ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांनीही संघाच्या पुढील राष्ट्रीय मोहिमेसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Share This Article
Exit mobile version