– “अधिक ऊस द्या, हंगाम यशस्वी करा” — अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे
नगर/शेवगाव (बाळासाहेब खेडकर) – आर्थिक अडचणींवर मात करत केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामाला सुरुवात केली आहे. ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांनी अधिकाधिक ऊस गाळपास देऊन हंगाम यशस्वी करण्यात सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे यांनी केले. गळीत हंगामात उत्पादित झालेल्या पहिल्या साखर पोत्याचे पूजन ज्येष्ठ पत्रकार रावसाहेब निकाळजे, बाळासाहेब खेडकर, अनिल कांबळे, उद्धव देशमुख, जयप्रकाश बागडे आणि इसाक शेख यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
पत्रकारांना ‘दुसऱ्यांदा’ सन्मान
केदारेश्वर साखर कारखान्याने पत्रकार सन्मानाची परंपरा कायम ठेवत ग्रामीण पत्रकारांना साखर पोत्याच्या पूजनासाठी यंदाही मानाचे आमंत्रण दिले. कारखान्याच्या इतिहासात स्व. दा. प. आपटे, महादेव कुलकर्णी आणि रामदास ढमाले यांच्या नंतर दुसऱ्यांदा पत्रकारांना पूजनासाठी आमंत्रित करण्यात आले. विधिवत पूजन करून पत्रकारांचा गौरव करण्यात आला. सहकारी संस्थांमध्ये पत्रकारांना असा मान देणारा संवेदनशील आणि सामाजिक बांधिलकी जपणारा कारखाना म्हणजे केदारेश्वर, अशी सर्वसाधारण भावना व्यक्त झाली. ग्रामीण भागातील पत्रकार सन्मान हा कारखान्याच्या मानवी मूल्यांचे दर्शन घडवणारा उपक्रम ठरला.

