– २१ डिसेंबरची एमपीएससी परीक्षा पुढे; आता होणार ४ आणि ११ जानेवारीला!
मुंबई (धम्मप्रिया कांबळे) – राज्यातील 246 नगरपालिका आणि 48 नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर 21 डिसेंबर रोजी नियोजित असलेली एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला असून, नव्या तारखा जाहीर केल्या आहेत. आता गट–ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 4 जानेवारी 2026 रोजी, तर गट–क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 11 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. यासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असून परीक्षार्थींनी याची नोंद घ्यावी, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
या दोन्ही परीक्षा पूर्वी 21 डिसेंबर रोजी आयोजित होणार होत्या. मात्र, राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुक्या 2024 च्या कार्यक्रमानुसार 2 डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने मतमोजणी 21 डिसेंबर रोजी घेण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. परीक्षेची वेळ आणि मतमोजणी एकाच दिवशी येत असल्याने आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून तपशीलवार माहिती मागवली होती. संबंधित माहिती आणि मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयोगाने सांगितले. परीक्षाकेंद्र आणि मतमोजणी केंद्रांतील कमी अंतर, लाऊडस्पीकर व वाहतूक कोंडीची शक्यता, विजयी उमेदवारांच्या मिरवणुका, तसेच परीक्षा व्यवस्थापनासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची कमतरता यांसारख्या मुद्यांवर अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली होती. या परिस्थितीत परीक्षेचे सुरळीत आयोजन करणे कठीण असल्याचे त्यांनी आयोगाला कळवले. या सर्व बाबींचा विचार करून आयोगाने परीक्षा नियोजित तारखेऐवजी पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आयोगाच्या परिपत्रकानुसार, एमपीएससी गट–ब संयुक्त सेवा पूर्व परीक्षा 4 जानेवारी 2026 रोजी आणि गट–क संयुक्त सेवा पूर्व परीक्षा 11 जानेवारी 2026 रोजी घेण्यात येणार आहेत.

