तयारीला लागा, गुलाल आपलाच !

admin 2 Min Read
2 Min Read

-सोशल मीडियावर विजयाचा स्फोट!

लोणार (वाजिद खान): नगरपालिका निवडणुकीचा उत्सव नुकताच पार पडला असून आता निकालाची प्रतिक्षा शिगेला पोहोचली आहे. मतदान संपताच प्रत्येक उमेदवार आकडेमोड करण्यात गर्क दिसत आहे. दरम्यान सोशल मीडियावर उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ‘विजय आपलाच!’ अशा पोस्ट आणि स्टेटसचा पाऊस पाडत जल्लोषाला सुरुवातच केली आहे.

लोणार नगर परिषद निवडणूक नेहमीप्रमाणे लोकशाहीचा रंगतदार उत्सव म्हणून पार पडली. काही राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेत 11 ते 12 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. मतदानानंतर सुरू झालेल्या विश्लेषणात अनेकांनी “गुलाल आपलाच!” असा आत्मविश्वास व्यक्त करू लागले आहेत. अनेक कार्यकर्त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर ‘तयारीला लागा, गुलाल आपलाच’ असे संदेश झळकताना दिसत आहेत. या निवडणुकीत 20 जागांसाठी तब्बल 95 उमेदवार रिंगणात उतरले होते. अपक्ष उमेदवारांपैकी वार्ड क्रमांक 1 मधील दोन उमेदवार निर्णायक मानले जात होते, तर वार्ड क्रमांक 5 मधील अपक्ष उमेदवार मोठ्या चर्चेत राहिला. वार्ड क्रमांक 3 मधील अपक्ष उमेदवारही चुरशीच्या लढतीत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दरम्यान, काही पक्षांना बंडखोरीचा चटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अपक्ष उमेदवारांच्या क्रॉस व्होटिंगमुळे अनेक समीकरणे बदलली असून, अंतिम निकालात अनपेक्षित अजेंडे समोर येतील, असे जाणकारांचे मत आहे. तथापि, राजकीय गुंतागुंत काहीही असो, अनेक उमेदवार आणि त्यांचे समर्थक विजयाची तयारी करून बसले आहेत. “गुलाल आपलाच आहे!” असा विश्वास व्यक्त करत आधीच जल्लोषाची मानसिक तयारी सुरू केली आहे. 21 डिसेंबरला कोण जिंकतो आणि कोणाला पराभवाचा धक्का बसतो—हे चित्र स्पष्ट होणार आहे. लोणारच्या राजकारणाचे ‘समीकरण’ खरेतर आता ईव्हीएमसमोरच ठरणार आहे.

Share This Article
Exit mobile version