-गुंज गावात हळदीने लिहिली आर्थिक क्रांती! -एक एकरात २५ ते ३० क्विंटल उत्पादन , आर्थिक क्रांतीला उजाळा.
साखरखेर्डा (अशोक इंगळे): गुंज हे साधारण २५०० लोकसंख्येचे गाव. गावातील बहुतांश लोक शेती व्यवसायाशी निगडीत. मात्र गेल्या दहा वर्षांत येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक कपाशी शेतीला फाटा देत हळद लागवडीकडे यशस्वी वाटचाल सुरू केली असून आज तब्बल १०० एकरांवर हळद लागवड करून आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय लिहिला आहे. शेतीत तंत्रज्ञानाचा वापर केल्यासच आर्थिक स्थैर्य मिळते, याचा आदर्श गुंजच्या शेतकऱ्यांनी घालून दिला आहे.
गुंज येथील प्रगतिशील शेतकरी गुलाबराव तुपकर पूर्वी कपाशी, सोयाबीन आणि तूर ही खरीप पिके घेत होते. पण कपाशी पिकावर वाढणारा खर्च, नैसर्गिक संकटांमुळे घटणारे उत्पादन आणि निघत नसलेला पेरणीचा खर्च यामुळे कर्जाचा डोंगर वाढत गेला. अशा परिस्थितीत शेती विक्रीचा विचार करावा लागेल अशी वेळ आली. शेती व्यतिरिक्त दुसरा कुठलाही व्यवसाय नसल्याने त्यांनी २०१० मध्ये धाडसाने निर्णय घेत कपाशीऐवजी हळद लागवडीची वाट धरली. पहिल्या वर्षी लागवडीचा खर्च जास्त असणार हे स्पष्ट होते, तरीही ते मागे हटले नाहीत. तीन हजार रुपये क्विंटल भावाने बेन विकत घेतले. एका एकरात १० क्विंटल म्हणजे ३० हजार रुपयांचे बेन आणून लागवड केली. पंधरा दिवसांनी खतांची मात्रा, चार ते पाच वेळा फवारणी, गादीवाफे तयार करणे आणि शेवटी हळद प्रक्रिया करून बाजारात विक्री—हे सर्व करताना त्यांनी नुकसानीची भीती मनातून काढून टाकली. पहिल्या वर्षी अपेक्षित नफा मिळाला नाही, पण त्यांनी आशा सोडली नाही. त्यांनी बेन तयार करण्याचे तंत्र आत्मसात केले आणि दुसऱ्या वर्षी पुन्हा हळद लागवड केली. आज १५ वर्षे झाली—तुपकर सातत्याने हळदीचे उत्पादन घेत आहेत. त्यांच्या यशाचा प्रभाव गुंजमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आज गावातील जवळपास १०० शेतकऱ्यांनी हळद लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. गुंजच्या शेतशिवारात कपाशीऐवजी हिरवेगार बहरलेली हळदच जिकडे तिकडे दिसते. एका एकरात वाफे तयार करण्यापासून काढणीपर्यंत सुमारे ७५ हजार खर्च येतो, तर उत्पादनातून ३ लाख ७५ हजारांपेक्षा अधिक उत्पन्न मिळते. मेहनत, पिकाचे नियोजन आणि शेतीतील तंत्रज्ञानाची जाण असल्यास शेतकरी हळद लागवडीत मोठे यश मिळवू शकतो, असा अनुभव तुपकर शेअर करतात.
हळद पावडर उत्पादन—गुंजचा नवा ब्रँड!
गुलाबराव तुपकर इथेच न थांबले. हळद काढणीनंतर तिची प्रक्रिया करून दर्जेदार हळद पावडर उत्पादन सुरू केले. यासाठी त्यांनी शेतकरी गट स्थापन केला, आवश्यक यंत्रसामग्री आणली आणि आत्मा योजनेअंतर्गत बाजारपेठ उपलब्ध करून दिली. आज या संस्थेच्या हळदीला दर्जेदार उत्पादक म्हणून ओळख मिळाली आहे. पारंपरिक पिकांना पर्याय शोधून अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांकडे वळल्यास आर्थिक स्थिती कशी बदलू शकते याचा आदर्श गुंजच्या शेतकऱ्यांनी राज्यासमोर ठेवला आहे, असे मत तुपकर व्यक्त करतात.