– ग्रामपंचायत सदस्य गणेश खरात यांच्या तक्रारीनंतर खळबळ!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – शिंदी गावातील एफ-क्लास सरकारी जमीन खाजगी व्यक्तीच्या नावावर करून देत घरकुलाचा लाभ मिळवून दिल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य गणेश तुकाराम खरात यांनी जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
खरात यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनकर काळे हे मार्च २०२३ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत शिंदी ग्रामपंचायतीत अधिकारी होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी ग्रामपंचायतीतील नमुना ८ रेकॉर्ड बेकायदेशीर पद्धतीने तयार करून शासनाच्या मालकीची एफ-क्लास जमीन असलेला मालमत्ता क्रमांक ८६६ अंबादास रामराम वायाळ यांच्या नावावर नोंदवला. यासाठी कर आकारणी रजिस्टरमध्ये एकाच मालमत्तेला दोन वेगवेगळे क्रमांक दिल्याचा आरोप आहे. तसेच अनुक्रमणिकेत खोडतोड, रजिस्टरची अप्रमाणित पाहणी आणि कोणताही ठराव नसताना नोंद केल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. एफ-क्लास जमीन शासनाची असतानाही ती खाजगी नावावर दाखवल्यामुळे सरकारी संपत्तीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे खरात यांनी म्हटले आहे. या जमिनीवर अंबादास वायाळ यांना घरकुलाचा लाभही देण्यात आला असून पहिल्या हप्त्यातील १५ हजार रुपये प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. वैयक्तिक मालकीच्या जमिनीवरच घरकुल मंजूर होण्याचा नियम असताना शासनाच्या मालकीच्या जमिनीवर लाभ देत फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या संबंधात कोणताही प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन नसल्याचेही तक्रारीत नमूद आहे. शासकीय पदावर असताना कर्तव्य पार पाडताना झालेल्या दुर्लक्षाबद्दल शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी खरात यांनी केली आहे.
दरम्यान, शिंदी गावातील सुमारे ५० घरे अतिक्रमित जागेवर उभी असून त्यांना नमुना ८ देण्यात आला असला तरी मालक म्हणून शासनाचे नावच नमूद आहे. वास्तविक प्लॉट स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी शासन नियमांनुसार रक्कम भरणे आवश्यक असल्याचे दिनकरराव काळे यांनी स्पष्ट केले आहे.

