महसूल विभागाचा पहाटेचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; टिप्परसह चार ब्रास रेती जप्त!

admin 1 Min Read
1 Min Read

– पांगरीत पहाटे महसूल विभागाची धडक कारवाई; अवैध रेतीमाफियांना चपराक; टिप्पर जप्त, तस्करांत खळबळ!

देऊळगावराजा/सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – मौजे पांगरी परिसरातील अवैध रेतीमाफियांची पहाटेच झोप उडवणारी कारवाई महसूल विभागाने आज (३ डिसेंबर) केली. पहाटे नेमके दोन वाजता सिनगाव–पांगरी रस्त्यावर अवैध रेती वाहतूक करणारा एक टिप्पर रंगेहाथ पकडत पथकाने माफियांच्या मुसक्या आवळल्या. कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेला टिप्पर देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात अटकाव जप्त स्थितीत उभा करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या मोहिमेमुळे परिसरातील रेती तस्करांत धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही कारवाई तहसीलदार डोंगरजाळ मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी विजय हिरवे, ग्राम महसूल अधिकारी संजय हंडे आणि महसूल सेवक कविता शिरसाट यांच्या पथकाने राबवली. जप्त टिप्परचा मालक महेश काकड (रा. गारगुंडी) असून चालक प्रथमेश बोरकर असल्याचे समोर आले आहे. वाहनातून अंदाजे चार ब्रास अवैध रेती जप्त झाल्याची माहिती महसूल विभागाने दिली. दरम्यान, या धडाकेबाज कारवाईनंतर “रेतीवाल्यांचा फडशा पुन्हा एकदा पाडला का?” अशी चर्चा परिसरात रंगू लागली आहे. महसूल विभागाकडून पुढीलही कारवायांची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Share This Article
Exit mobile version