– नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरला!
– एक्झिट पोलही २० डिसेंबरच्या मतदान समाप्तीपूर्वी जाहीर करण्यास मनाई!
मुंबई (धम्मप्रिया कांबळे) – राज्यातील सर्व २८८ नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. त्याचबरोबर मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्षही २० डिसेंबररोजी मतदान समाप्तीच्या अर्ध्या तासापर्यंत जाहीर करता येणार नाहीत, असेही न्यायालयाच्या आदेशात नमूद केले आहे. निकाल लांबणीवर पडल्याने उमेदवारांचे भवितव्य मात्र टांगणीला लागले आहे. विरोधकांनीदेखील या निर्णयानंतर नाराजी व्यक्त करत, सत्ताधार्यांना मतचोरी करायची आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
राज्यातील २६४ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान झाले; तसेच सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार २४ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसह सर्व सदस्यपदांसाठी आणि ७६ नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील १५४ सदस्यपदांच्या जागांसाठी २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. या सर्व ठिकाणी आता २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी दहा वाजेपासून मतमोजणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने सुरुवातीला ४ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील २४६ नगरपालिका व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी होणार होत्या व त्याचा निकाल ३ डिसेंबरला जाहीर केला जाणार होता. परंतु, निवडणूक आयोगाने सदस्यपदाच्या उमेदवारांविरोधात न्यायालयात याचिका दाखल आहेत तिथे केवळ संबंधित प्रभागांच्या आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांविरोधात याचिका दाखल आहेत तिथे संपूर्ण नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्यासाठी २९ नोव्हेंबर रोजी नवीन कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार संबंधित नगरपालिका व नगरपंचायती आणि प्रभागांमध्ये २० डिसेंबर रोजी मतदान घेतले जाणार आहे तर, २१ डिसेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्याविरुद्ध वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील उमेश कामडी व इतर दोघे आणि वरोरा येथील सचिन चुटे यांच्यासह इतर काहीजनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व रजनीश व्यास यांच्यापुढे सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने हे आदेश दिले.

