बुलढाण्यात पोलिसांच्या तावडीतून बोगस मतदार पळाला!

admin 3 Min Read
3 Min Read

– आ. संजय गायकवाड यांनी ग्रामीण भागातून बोगस मतदार आणले – हर्षवर्धन सपकाळ
– बुलढाण्यासह इतरही भागात बोगस मतदान झाल्याचा संशय?

बुलढाणा (बाळू वानखेडे) – बुलढाणा शहरासह नगरपालिकांच्या इतर ठिकाणच्या मतदानातही बोगस मतदान झाल्याचा संशय बळावला असून, बुलढाणा येथील प्रभाग क्र. ६ मधील जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण केंद्र येथे स्थानिक नागरिकांनी एका संशयित मतदाराला बनावट ओळखपत्रासह पकडले. मात्र, हा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात देताच, त्या प्रभागातील एका उमेदवाराने स्वतःच्या नातेवाइकाच्या मदतीने त्याला पळवून लावल्याची खळबळजनक घटना घडली. समाजमाध्यमांवर सध्या त्याची चित्रफीत व्हायरल झाली आहे. दरम्यान, काँग्रेसने आ. संजय गायकवाड व त्यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांच्यावर टीकेची झोड उठवली असून, निवडणूक अधिकार्‍यांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला. ‘बुलढाण्यात शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी ग्रामीण भागातून लोकांना आणून नगरपालिका निवडणुकीत बोगस मतदान करून घेत आहेत. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते या बोगस मतदारांना पकडून पोलिसांच्या हवाली करत असताना आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांनी पोलिसाला शिवीगाळ आणि दमदाटी करून बोगस मतदाराला पळवून लावले. या प्रकरणी कुणाल गायकवाड यांच्याविरोधात बोगस मतदान आणि सरकारी कामात अडथळा आपल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक केली पाहिजे, अशी मागणीदेखील काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

बुलढाणा येथील प्रभाग क्र. १५ मधील गांधी प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावरही कोथळी (ता. मोताळा) येथून कथितरीत्या मतदानासाठी आलेल्या दोन जणांना स्थानिकांच्या सतर्कतेने पकडण्यात आले. प्राथमिक पडताळणीत त्यांची ओळख संशयित असल्याचे समोर आले असून, त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा एसडीओ शरद पाटील यांनी दिली. दोन्ही प्रकरणांच्या चौकशीला सुरुवात झाली असल्याचे ते म्हणालेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या वादाला अधिक हवा देत, सोशल मीडियावर पोस्ट केली. घाटाखालून दोन गाड्यांत बोगस मतदार आणले गेले आणि काहींनी दुसर्‍याच नावावर मतदान करण्याचाही प्रयत्न केला, असा आरोप सपकाळ यांनी केला. याप्रकरणी तत्काळ कारवाईची मागणीही त्यांनी केली असून, त्यामुळे बुलढाण्यात राजकीय वातावरण आणखी तापले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी सांगितले की, बोगस मतदानाचा प्रयत्न हा एक वर्षांच्या शिक्षेस पात्र गुन्हा आहे. दोन्ही घटनांमुळे निवडणुकीतील शुचितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?

बोगस मतदार पकडल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल गायकवाड याने मध्यस्ती केली. पकडलेल्या शिवसेना कार्यकर्त्याला पळून जाण्यास मदत केली. उपस्थित पोलिसालादेखील शिवीगाळ आणि दमदाटी करताना तसेच बोगस मतदाराचा बचाव करताना कुणाल गायकवाड व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत. आमदार पुत्रावर सरकारी कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणी तसेच बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणीही हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

Share This Article
Exit mobile version