बॉलीवूडचे ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांचे निधन; चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत!

admin 3 Min Read
3 Min Read

– विर्लेपाले येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार; सनी देओलने दिला मुखाग्नि!

मुंबई (धम्मप्रिया कांबळे) – बॉलीवूडचे ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांचे सोमवारी दुपारी १ वाजता त्यांच्या जुहू येथील बंगल्यावर निधन झाले. ८९ वर्षीय ज्येष्ठ अभिनेत्याच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला. प्रकृतीच्या कारणास्तव मागील अनेक दिवसांपासून ते रूग्णालयात उपचार घेत होते. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. यानंतर घरीच त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र अचानक आज सकाळी एक रूग्णवाहिका धर्मेंद्र यांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर चर्चांना उधाण आले. विलेपार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मोठा मुलगा सनी देओलने मुखाग्नि दिला. अंत्यविधीप्रसंगी सलमान खान, संजय दत्त, अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाला एका युगाच्या अंताचा संकेत म्हटले आहे.

धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमध्ये झाला. त्यांचे पूर्ण नाव धरमसिंह देओल आहे. चाहते त्यांना प्रेमाने गरम-धरम म्हणतात. धर्मेंद्र यांनी १९६० मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांची रेस्तराँ चैन आहे. शाहरुख खान, सलमान खान, अमिषा पटेल आणि गोविंदा यांच्यासह अनेक कलाकार त्यांना भेटण्यासाठी रूग्णालयात पोहोचले होते. २०१२ मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मभूषण हा भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविण्यात आले. सहा दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ‘यादों की बारात’, ‘मेरा गाव मेरा देश’, ‘नौकर बीवी का’, ‘फूल और पत्थर’, ‘बेताब’, यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले.


धर्मेंद्र यांनी जवळपास ३०० हून अधिक सिनेमांमध्ये काम केले होते. वयाची नव्वदी गाठली तरी ते बॉलिवूडमध्ये सक्रिय होते. १९६० साली अभिनयात पदार्पण केलेल्या धर्मेंद्र यांनी ६ दशकं प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांच्या आगामी सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला होता. धर्मेंद्र हे ‘इक्कीस’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार होते. हाच त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला. धर्मेद्र यांनी गेली अनेक वर्ष त्यांच्या अभिनयाने बॉलिवूडवर राज्य केले. बॉलिवूडचे ही मॅन म्हणून धर्मेंद्र यांची ओळख होती. शोले, बंदिनी, हकीकत, मेरा कसूर क्या है, काजल, आकाशदीप, देवर अशा विविध सिनेमांमध्ये त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. धर्मेंद्र यांचे अलीकडेच रॉकी और रानी की प्रेम कहानी आणि तेरी बातों में ऐसा उलझा जिया हे दोन सिनेमे रिलीज झाले होते. दोन्ही सिनेमांना बॉक्स ऑफिसवर सुपरहिट यश मिळाले.

Share This Article
Exit mobile version