पत्नीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न करणार्‍या विशाल काकडेला अजितदादांच्या ‘राष्ट्रवादी’कडून उमेदवारी!

admin 3 Min Read
3 Min Read

– न्यायालयीन कोठडीतून पोलिस संरक्षणात येऊन दाखल केला निवडणूक अर्ज
– काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे मिळवले तिकीट!

चिखली (राजेश लोखंडे) – पत्नीला पेट्रोल ओतून जीवंत जाळण्याचा प्रयत्न करणार्‍या चिखली शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष असलेल्या विशाल उर्फ रिकी काकडे याला अजितदादा पवार यांच्या सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिल्याने चिखली शहरात खळबळ उडाली आहे. विशाल काकडे हा प्रथम काँग्रेसकडून निवडणूक लढवणार होता. पण त्याचा अर्ज फेटाळण्यात आल्याने राष्ट्रवादीने ऐनवेळी त्याला उमेदवारी देऊन आपल्या गोटात ओढले. विशाल काकडे याने न्यायालयाच्या परवानगीने नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग १३ अ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्याने न्यायालयीन कोठडीत असताना पोलिस संरक्षणात येऊन निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

सविस्तर असे, की दि. ९ नोव्हेंबर रोजी चिखली शहरात चिखली शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष असलेल्या विशाल उर्फ रिकी काकडे याने त्याच्यावर त्याची पत्नी घेत असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून व कौटुंबिक कलहातून पत्नी नमिता काकडे हिच्यावर पेट्रोल टाकून तिला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी चिखली शहर पोलिस ठाण्यात विशाल काकडेविरुद्ध पत्नी नमिता काकडे तिने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर विशाल काकडे हा अद्यापही न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला चिखली नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रभाग क्रमांक १३ अ मधून उमेदवारी मिळाली आहे. त्यानंतर त्याने पोलिस संरक्षणात येऊन निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडे आपली उमेदवारी दाखल केला. त्यानंतर त्याच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, विशाल काकडे हा सुरूवातीला काँग्रेसतर्पेâ निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होता. पण त्याचा अर्ज नाकारण्यात आला. त्यामुळे त्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत तेथील उमेदवारी मिळवली. राष्ट्रवादीनेही त्याला बिनधोकपणे उमेदवारी दिली. त्यानुसार त्याने पोलिस संरक्षणात आपला अर्ज दाखल केला. या प्रकरणी टीकेची झोड उठल्यानंतर अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्यावर षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप केला आहे.


यासंबंधीच्या माहितीनुसार, विशाल काकडे व त्यांची पत्नी नमिता काकडे यांचा २०२० मध्ये विवाह झाला होता. त्यांना ३ व १ वर्षांची २ मुले आहेत. नमिता काकडे  नगरपरिषदेत कामगार म्हणून काम करत होत्या. त्यांना आपल्या पतीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यातच नवर्‍याच्या फोनमध्ये मुलींचे मेसेजेस पाहून त्यांचा संशय अधिकच बळावला. त्यातून दोघांत टोकाचा वाद झाला. अखेर विशाल काकडे याने पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. पण नमिताने वेळीच स्वतःला सावरत पाण्याच्या ड्रममध्ये आपली साडी टाकून आग विझवली. यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेनंतर त्यांनी चिखली शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी सद्या न्यायालयीन कोठडीत आहे.

Share This Article
Exit mobile version