दोन दुचाक्या समोरासमोर धडकल्या; एक ठार, एक गंभीर जखमी

admin 2 Min Read
2 Min Read

– साखरखेर्डा ते लव्हाळा रोडवरील मोहाडी फाट्याजवळील दुर्देवी अपघात; देऊळगावमाळी गावावर शोककळा!

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – लव्हाळा ते साखरखेर्डा रोडवर मोहाडी फाट्याजवळ उतारामध्ये दोन दुचाक्या समोरासमोर धडकल्याने देऊळगावमाळी येथील एक युवक ठार तर सवडद येथील एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज, दि.२० नोव्हेंबरच्या दुपारी पाच वाजताचे सुमारास घडली. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

सविस्तर असे, की देऊळगाव माळी येथील गणेश विश्वनाथ मते, वय २८ हा युवक आपल्या पलसर क्र. एमएच १८ सी डी ६११६ दुचाकीने लव्हाळाकडून साखरखेर्डा येथे जात असताना, सवडद येथील सुतार अनिल कचरू खोलगडे, वय ३० हा साखरखेर्डा येथून आपली दुचाकी एचएफ डिलक्सने क्र एमएच ३७, ९८४७ ने सवडद या आपल्या गावी चालला होता. मोहाडी फाट्यानजीक उतारात दोन्ही मोटारसायकलची समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही युवक गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने काही नागरिकांनी साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. साखरखेर्डा येथे प्राथमिक उपचार करून तातडीने चिखली येथील खासगी रुग्णालयात हलवले असता, यापैकी गणेश याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर अनिल खोलगडे याच्यावर उपचार सुरू आहेत. गणेश मते हा मेहकर येथे गाभणे हॉस्पिटलमधे कम्पाउंडर म्हणून नोकरीला होता. दिवसभर देऊळगाव माळी येथे पानठेला चालवून तो रात्री मेहकर येथे नोकरी करत होता. दरम्यान, ठाणेदार गजानन करेवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन दोन्ही दुचाकीचा पंचनामा करून वाहने ताब्यात घेतली आहेत. पुढील तपास पोलिस करत आहेत.

Share This Article
Exit mobile version