भाजपसाठी २५ वर्षे प्रामाणिक काम केले, पक्षानेच फसवणूक केली!

admin 2 Min Read
2 Min Read

– भाजपचे माजी प्रदेश सरचिटणीस अरूण मुंढे यांनी डागले टीकास्त्र!
– लोकप्रतिनिधीच्या दबावामुळेच आपल्याला डावलले; मुंढेंची नामोल्लेख टाळून आ. राजळेंवर टीका!

शेवगाव/नगर (बाळासाहेब खेडकर) – भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे यांनी उमेदवारी प्रक्रियेत झालेल्या अन्यायाविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, पक्षातील काही लोकप्रतिनिधींवर थेट हल्लाबोल केला. ‘२५ वर्षे प्रामाणिकपणे पक्षासाठी काम केले, पण शेवटी पक्षानेच फसवणूक केली,’ असे म्हणत त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मुंढे म्हणाले की, निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारी निश्चित असल्याचे काही दिवसांपूर्वी सांगूनही अखेरच्याक्षणी लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे आपल्यासारख्या निष्ठावान पदाधिकार्‍यांना डावलण्यात आले. ‘यातूनच प्रदेशाध्यक्षांपेक्षा लोकप्रतिनिधी मोठे असल्याचे स्पष्ट झाले,’ असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, की ‘भाजपमध्ये व्यक्तीपेक्षा पार्टी मोठी असे वाटायचे; पण आता बाहेरून आलेले सम्राट झाले आहेत. राज्यभर निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जात आहे. पक्षाच्या बोटीला छिद्र पडू लागले आहे आणि हे थांबवण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.’ मुंढे यांनी भाजपमधील राजकीय हस्तक्षेपावर टीका करत सांगितले की, साखर व शिक्षण क्षेत्रातील सम्राट आपल्या नातेवाईकांना महत्व देत आहेत. प्रामाणिक कार्यकर्त्यांना फक्त ‘बूथ सांभाळा’ अशीच सूचना देण्यात येते. नगराध्यक्ष पदाच्या सर्वेक्षणात आपण अव्वल असतानाही उमेदवारी एका लोकप्रतिनिधीच्या जवळच्या नातेवाईकाला देण्यात आली असल्याचा आरोप केला आहे. तसेच भाजपचे कधीच बटन न दाबलेल्या सात जणांनाही दोन दिवसात उमेदवारी बहाल केल्याचा आरोप करत त्यांनी ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक अशोक आहुजा, अंकुश कुसळकर, दिगंबर काथवटे या निष्ठावंयांनाही डावलण्यात आल्याचे सांगितले. या सर्व अन्यायामुळेच शिवसेना (शिंदे गट)कडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी त्यांच्या पत्नी माया मुंढे यांच्याकडे द्यावी लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उमेदवारी जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले यांसह अनेक पदाधिकार्‍यांचे त्यांनी आभार मानले.


‘शिवसेनेशी त्यांचा काडीमात्र संबंध नाही’ – बाबुशेठ टायरवाले
शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले यांनी मुंढे यांच्या आरोपांना दुजोरा देण्याऐवजी ते खोटे असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोणीही फोटो काढू शकते. विद्या गाडेकर यांचा शिवसेनेशी कोणताही संबंध नाही. त्या पदाधिकारी नसल्याने उमेदवारी नाकारली, हे सांगणे चुकीचे आहे. शिवसेनेमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीला थारा नाही आणि उमेदवारी पक्षप्रमुखांच्या सूचनेनुसारच दिली जाते.’

Share This Article
Exit mobile version