चिखली, बुलढाणा, खामगावमध्ये ‘घराणेशाही’!; नातेवाईकांना उमेदवारी, कार्यकर्ते मात्र घरी?

admin 5 Min Read
5 Min Read

– विधानसभेतल कर्ज, मिनी विधानसभेत परतफेड; काही ठिकाणी हिशोब चुकताचीही भीती!
– मेहकर, लोणारात आ.खरातांची, सिंदखेडराजा, देऊळगावराजात आ.मनोज कायंदे, चिखलीत आ. श्वेताताई महाले तर खामगावत माजी आमदार सानंदांची सत्वपरीक्षा!
– युती, आघाडीत फाटाफूट, पक्षनिष्ठाही वेशीला! तिकीट नाकारताच दुसर्‍याशी घरोबा!
– सिंदखेडराजात आ. मनोज कायंदेंना रोखण्यासाठी कट्टर राजकीय विरोधक एकत्र?

बुलढाणा (बाळू वानखेडे) – काँग्रेसवर नेहमी घराणेशाहीचा आरोप करणार्‍या भारतीय जनता पक्ष, शिंदे सेनादेखील आता घराणेशाहीतच गुरफटला आहे. नगरपरिषद निवडणुकीसाठी चिखलीत काँग्रेस तर बुलढाणा व खामगावमध्ये भाजप, शिंदे सेनेच्या नेत्यांनीही घरच्याच उमेदवाराला संधी देत घराणेशाही दाखवून दिली. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांवर घरी बसण्याची नामुष्की ओढवली. काही ठिकाणी विधानसभेतील कर्ज मिनी विधानसभेत फेडण्याची नामी संधी आल्याचे दिसत असले तरी काही ठिकाणी हिशोब चुकता करण्याची भीतीदेखील व्यक्त केल्या जात आहे. मेहकर, लोणारमध्ये आमदार सिद्धार्थ खरात, देऊळगावराजा व सिंदखेडराजात आमदार मनोज कायंदे तर खामगावमध्ये माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांची सत्वपरीक्षा या निमित्ताने होईल. एकीची मोट बांधणार्‍या युती, आघाडीत फाटाफूट झाली असून, कित्येक वर्षांपासून पक्षात काम करणार्‍या स्थानिक नेत्यांनी मात्र पक्षाने तिकीट नाकारताच क्षणात कोलांटउडी हाणली. मेहकर, लोणारसह काही ठिकाणी दोस्तीतही कुस्ती रंगणार असल्याने सत्तेसाठी वाटेल ते.. असाच सूर उमटू लागला आहे. सिंदखेडराजात आ. मनोज कायंदे यांना रोखण्यासाठी दोन कट्टर राजकीय विरोधक एकत्र आले आहेत.

राज्यात नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू असून, उमेदवारी अर्ज भरण्याची दि.१७ नोव्हेंबररोजी मुदत संपली. प्रमुख राजकीय पक्षांनी बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारी भरण्याच्या अखेरच्या काही मिनिटाआधी उमेदवारांना एबी फॉर्म दिले, तरीही काही ठिकाणी फटका बसलाच. चिखली नगरपालिकेत काँग्रेसच्यावतीने काशिनाथआप्पा बोंद्रे या राहुल बोंद्रे यांच्या निकटवर्तीयांना उमेदवारी देण्यात आली. बुलढाणा नगरपालिकेत भाजपच्यावतीने माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी पत्नी अर्पिता शिंदे यांना उमेदवारी दिली, तर शिंदे सेनेच्यावतीने आ.संजय गायकवाड यांनीदेखील पत्नी पूजाताई गायकवाड यांना उमेदवारी देत, त्यांचा अर्ज दाखल केला. तसेच, नगरसेवक पदासाठी मुलगा मृत्यूंजय याचाही अर्ज भरला आहे. मेहकरातही प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्याम उमाळकर यांनी पुतण्या वैभवला मैदानात उतरवले आहे. खामगावमध्ये इच्छूक जास्त असल्याने बंडखोरीचा धाक दाखवत, भाजपाचे कॅबिनेट मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी अपर्णा सागर फुंडकर यांना भाजपने उमेदवारी दिली. एकंदरीत पाहता, नेत्यांनी आपल्या नात्यातच उमेदवार दिल्याने निष्ठावान कार्यकर्ते नाराज झाले असून, आता नेत्यांना दणका देण्याच्या तयारीत आहेत. देऊळगावराजा नगरपरिषदमध्ये कट्टर राजकीय विरोधक असलेले माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे व माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी दिलजमाई करत शहर विकास आघाडीच्या नावाखाली नेहा बलवंत सुगंठ यांना उमेदवारी दिली. येथे आमदार मनोज कायंदे यांना रोखण्यासाठी ही खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काही ठिकाणी युती, आघाडी असल्याने एकमेकांच्या मदतीने उमेदवार विधानसभेत पोहोचले. त्यामुळे विधानसभेतील कर्ज मिनी विधानसभेत फेडण्याची काहींना निश्चितच नामी संधी आल्याचे दिसून येत असले तरी, काही ठिकाणी हिशोब चुकता होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मेहकर नगरपालिकेत काँग्रेसच्यावतीने कासम गवळी तर शिवसेना (ठाकरे) पक्षावतीने किशोर गारोळे, शिवसेना शिंदे गटाच्यावतीने अजय उमाळकर व भाजपाच्यावतीने सारंग प्रकाश माळेकर रिंगणात आहेत. लोणार नगरपालिकेत काँग्रेसच्यावतीने मीरा भूषण मापारी तर शिवसेना (ठाकरे) पक्षाच्यावतीने रंजना गोपाल बछीरे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर ही पहिलीच निवडणूक असल्याने आमदार सिद्धार्थ खरात यांची मेहकर व लोणारात तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलेले माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांची खामगावात तर आमदार मनोज कायंदे यांची देऊळगावराजा व सिंदखेड राजा सत्वपरीक्षा असणार आहे. जिल्ह्यात बुलढाणा, खामगावसह इतर ठिकाणी मात्र शिवसेना (ठाकरे) महाविकास आघाडी सोबतच असल्याचे दिसून येत आहे तर राष्ट्रवादी (शरद पवार)सह वंचित आघाडीनेही काही ठिकाणी उमेदवारी अर्ज भरल्याचे सांगितले जात आहे. खामगाव नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्यावतीने माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी चेतना संजय शर्मा यांचा उमेदवारी अर्ज भरला तर काँग्रेसने स्मीता किशोर भोसले यांना मैदानात उतरवले आहे. पक्षनिष्ठा वेशीला टांगत काही जणांनी उमेदवारी नाकारताच दुसर्‍या पक्षाचा एबी फॉर्म घेत, उमेदवारी अर्ज भरल्याचे दिसून येत आहे. यामध्ये बुलढाण्यात काँग्रेसचे सुनील सपकाळ यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश करत नगरसेवक पदाची उमेदवारी घेतली. मेहकरमध्ये माजी नगराध्यक्ष विलास चनखोरे यांना काँग्रेसने नगराध्यपदाची उमेदवारी नाकारताच, शिवसेना (ठाकरे)मध्ये प्रवेश केला तर चिखलीत नीलेश गावंडे यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारताच त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी घेत मैदानात उतरले. एकंदरीत कितीही युती, आघाड्या कायम राहणार असल्याचे सांगितले जात असले तरी कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्याचे सांगत, अनेक पक्षांनी घरचे तसेच सोयीने उमेदवार दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निष्ठावान नाराजी बोलून दाखवत आहेत.


आजपासून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सुरूवात झाली असून, दि. १९ ते २१ नोव्हेंबर या दरम्यान उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील. तर २६ नोव्हेंबर रोजी उमेदवारांची चिन्हांसह अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी येत्या २ डिसेंबरला मतदान होणार आहे तर ३ डिसेंबरला निकाल लागणार आहे. बंडखोरी करणार्‍या कार्यकर्त्यांना शांत करून त्यांची अर्ज मागे घेण्याची मोठी कसरत आता स्थानिक नेत्यांना करावी लागणार आहे.

Share This Article
Exit mobile version