एबी फॉर्मवरून प्रा. किसन चव्हाण व निवडणूक निर्णय अधिकार्‍यांत खडाजंगी!

admin 3 Min Read
3 Min Read

– एबी फॉर्म नसल्याचे कारण सांगून सौ. सुनीता चव्हाण यांचा अर्ज ठरला बाद; फेरतपासणीत ठरला वैध!
– २८१ उमेदवारी अर्ज दाखल; पैकी १७८ अर्ज पात्र; १०३ अर्ज अपात्र; अनेक दिग्गजांना फटका?

शेवगाव/नगर (बाळासाहेब खेडकर) – शेवगाव नगरपरिषद निवडणुकीत आज नाट्यमय घडामोड घडली. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश नेते प्रा. किसन चव्हाण यांच्या पत्नी सौ. सुनिता चव्हाण यांनी नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी एबी फॉर्म नसल्याचे कारण दाखवत बाद केल्याचा आरोप प्रा. चव्हाण यांनी केला. प्रा. चव्हाण यांनी अधिकार्‍यांना कारण विचारले असता, अर्जासोबत पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म जोडलेला नसल्याचा दावा करण्यात आला. मात्र, चव्हाण यांनी १६ तारखेलाच अर्जासोबत एबी फॉर्म जोडल्याचे त्यांनी निर्णय अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर प्रा. चव्हाण यांनी वेळोवेळी अर्जाची पुनर्तपासणी करण्याची मागणी केली. याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी व प्रा. चव्हाण यांच्यात चांगलीच खडाजंगी उडाल्याचे दिसून आले.

दरम्यान, प्रा. किसन चव्हाण यांचा आरोप असा की, तपासणीची मागणी केल्यावर संबंधित अधिकार्‍यांनी त्यांना कारवाईची धमकी दिली. यामुळे प्रा. चव्हाण आक्रमक झाले आणि निवडणूक निर्णय अधिकारी दळवी यांच्याशी तीव्र शब्दात खडाजंगी झाली. अखेर पुन्हा तपासणी करण्यात आली असता, अर्जासोबत वंचित आघाडीचा एबी फॉर्म अस्तित्वात असल्याचे स्पष्ट झाले. पुनर्तपासणीत एबी फॉर्म असल्याची खात्री. झाल्याने निवडणूक निर्णय अधिकार्‍यांचा हलगर्जीपणा व भोंगळ कारभार उघड झाला संबंधित अधिकार्‍यांनी मावाळ भूमिका घेऊन या प्रकारानंतर निवडणूक निर्णय अधिकारी दळवी यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि वाद शांत झाला. चव्हाण यांनी अशा बेजबाबदार कारभारावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. या घटनेमुळे शेवगाव नगरपरिषदेच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ही घटना निवडणुकीतील पारदर्शकता व निवडणूक अधिकारी यांच्या जबाबदारीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.


उमेदवारी अर्जासोबत एबी फॉर्म असताना तुम्ही अधिकारी छाननी तरी कशाची करता?’ असा थेट सवाल प्रा. किसन चव्हाण यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना उपस्थित केला. या प्रश्नावर अधिकारी निरुत्तर झाले आणि त्यांनी चुकीची कबुली देत दिलगिरी व्यक्त केली आहे.


२८१ उमेदवारी अर्ज दाखल; पैकी १७८ अर्ज पात्र; १०३ अर्ज अपात्र; अनेक दिग्गजांना फटका?

शेवगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मोठी गर्दी पाहायला मिळाली. नगराध्यक्ष पदासाठी २४ तर नगरसेवक पदासाठी २५७, असे मिळून एकूण २८१ उमेदवारी अर्ज निवडणूक विभागाकडे दाखल झाले. उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर १७८ अर्ज पात्र ठरले असून तब्बल १०३ अर्ज अपात्र झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी रात्री उशिरा जाहीर केली आहे. छाननी प्रक्रियेत अपात्र ठरलेल्या उमेदवारांमध्ये काही प्रमुख राजकीय दिग्गजांचाही समावेश असल्याची चर्चा तालुकाभर सुरु झाली आहे. त्यामुळे अनेकांच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. छाननी प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू असल्यामुळे अधिकृत यादी मात्र रात्री उशिरा पर्यंत हाती आली नाही. नगराध्यक्ष पदासाठी २४ पैकी १० अर्ज पात्र तर नगरसेवक पदासाठी १३६ अर्ज पात्र झाले आहेत त्यामध्ये एका उमेदवाराने अनेक अर्ज दाखल केले तर त्यांचा एकच अर्ज ग्राह्य धरला जात आहे.

Share This Article
Exit mobile version