अखेर बुलढाणा ते वझर आघाव मुक्कामी बस सुरू!

admin 2 Min Read
2 Min Read

– किनगावजट्टू येथे सहदेव लाडसह प्रवाशांकडून चालक व वाहकाचे स्वागत!

बिबी (ऋषी दंदाले) – बुलढाणा ते वझर आघाव ही मुक्कामी बस बंद पडल्याने प्रवाशांतून संताप व्यक्त होत होता. याप्रश्नी क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी एसटी महामंडळाला निवेदनही दिले होते. त्यामुळे अखेर ही मुक्कामी बस सुरू झाली असून, तिचे प्रवाशांनी जोरदार स्वागत केले आहे. लाड यांच्यासह प्रवाशांनी सकाळी सहा वाजता किनगावजट्टू येथे चालक व वाहकाचे शाल- श्रीफळ देऊन स्वागत केले.

मागील २५ वर्षांपासून सुरूवातीला बुलढाणा ते किनगावजट्टू व त्यानंतर बुलढाणा ते भूमराळा व मागील काही वर्षापासून बुलढाणा व वझर आघाव ही बसफेरी सुरू आहे. संध्याकाळी पाच वाजता बुलढाण्यावरून निघणारी ही बसगाडी चिखली, मेरा फाटा, अंत्री खेडेकर, साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा, बीबी, किनगावजट्टूमार्गे वझर आघावला जाते व सकाळी साडेपाच वाजता वझर आघाव येथून बुलढाण्याकडे रवाना होते. मागील काही महिन्यापासून सदर बसफेरी बंद झाल्यामुळे या मार्गात येणार्‍या प्रवाशांचे अतोनात हाल होत होते. प्रवाशांची मागणी पाहाता, क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी विभाग नियंत्रक बुलढाणा यांच्याकडे लेखी निवेदन देऊन लवकरात लवकर बस फेरी सुरू करण्याची मागणी केली व बस फेरी सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. लाड यांच्यासह प्रवाशांची मागणी लक्षात घेता, वाहतूक नियंत्रक बुलढाणा यांनी दिनांक १७ नोव्हेंबरपासून बुलढाणा ते वझर आघाव बस फेरी नियमित सुरू केली आहे. ही गाडी दि. १८ नोव्हेंबरला किनगावजट्टू येथे आली असता, बस गाडीचे पूजन करून चालक व वाहकाचे शाल-श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी संजय महाजन, दर्शन धारतरकर, संजु खडके, सुनील धारतरकर, शब्बीर शहा, अनिल सानप, तन्वीर भाई उपस्थित होते. सदर बसफेरी सुरू झाल्यामुळे या मार्गात येणार्‍या प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Share This Article
Exit mobile version