– दोन लाख ३६ हजाराचा मुद्देमाल जप्त; साखरखेर्डा पोलिसांची कारवाई!
– आता अवैध ताडीविक्री, गांजाविक्रीविरूद्धही पोलिसांनी कारवाईची मागणी
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – साखरखेर्डा आणि परिसरात अवैधरित्या जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता, काल सायंकाळी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात २ लाख ३६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून १४ आरोपींना अटक केली होती.
साखरखेर्डा येथील गावात एका ठिकाणी अवैधरित्या जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी छापा टाकला असता, १४ व्यक्ती जुगार खेळताना आढळून आली. त्यांच्या जवळून नगदी ९ हजार ३१० रुपये, तासपत्ता, १० मोबाईल, तीन मोटारसायकल असा एकूण २ लाख ३६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ ( असं ) अंतर्गत सुरेश सकरु शिराळे, सैय्यद जुनेद सैय्यद समदान, ज्ञानेश्वर तुळशिराम वाघमारे, आरीफ खान ताज खान, अफजल शहा अकबर शहा, शेख कलीम शेख दस्तगीर, योगेश सखाराम पर्हाड, आसीफ खान अख्तर खान, शेख साजिद शेख कमर, हन्नान शहा मन्नान शहा, वामन शंकर पवार, ज्ञानेश्वर बाळाजी लष्कर सर्व राहणार साखरखेर्डा, राजू सोनाजी जागृत रा. हिवरखेड तालुका मेहकर, संजय प्रकाश मोरे गुंजाळा ता. चिखली यांना अटक केली. ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली साखरखेर्डा पोलिसांनी ही कारवाई केली असून पुढील तपास पोहेकॉ. बाजीराव खरात हे करीत आहेत. साखरखेर्डा येथील अवैध ताडी विक्री, अवैध दारू विक्री, गांजा विक्री यावरही पोलिसांनी कारवाई करावी, अशी अपेक्षा जनतेची आहे. अवैध ताडी विक्री जोरात सुरू असून त्यात रासायनिक गोळीचा वापर केला जातो. त्यामुळे युवकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यात काही आत्महत्या करण्यासही परावृत्त होतात. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

