गोरेगाव येथील महाजल योजनेतील गैरकारभाराची वरिष्ठस्तरीय चौकशी; बीडीओंच्या लेखी आश्वासनाने तरूणांचे उपोषण सुटले!

admin 2 Min Read
2 Min Read

– गटविकास अधिकारी डांगर यांच्या लेखी आश्वासनाने उपोषणाची सांगता!

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – गोरेगाव येथील दोन युवकांनी महाजल योजनेसह इतर कामाची वरिष्ठ अधिकार्‍यांनी चौकशी करावी, आणि ग्रामस्थांना न्याय द्यावा, यासाठी ग्रामपंचायत समोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. त्यावर काल, दि.१५ नोव्हेंबररोजी सिंदखेडराजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजितकुमार बांगर यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषणाची सांगता झाली.

गटविकास अधिकारी अजितकुमार बांगर, गोरेगावचे जेष्ठ नागरिक तथा माजी उपसरपंच भिकाजी पाटील, सेवानिवृत्त प्राचार्य तथा ज्येष्ठ पत्रकार डी. एन. पंचाळ यांच्याहस्ते उपोषणकर्त्यांना निंबू-पाणी देऊन उपोषण सोडविण्यात आले. यावेळी सिंदखेडराजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बांगर यांनी उपोषणकर्ते युवकांना विहित मुदतीत संपूर्ण व सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाईसह सविस्तर माहिती दिली जाईल, असे लेखी आश्वासन दिले. यावेळी पंचायत समितीचे सहाय्यक लेखाधिकारी किरण मगर, विस्तार अधिकारी राजेश्वर पवार, उपसरपंच बिल्कीसबी अख्तर खा पठाण, तंटामुक्ती अध्यक्ष खुशालराव पंचाळ, गोरेगाव येथील युवा नितीन रमेश पंचाळ आणि जीवन गजानन पंचाळ या दोन युवकांनी स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या लाखो रूपयांच्या कथित भ्रष्टाचारासह ग्रामविकासाबाबत विविध मागण्याकरिता दि.१३ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. या उपोषणाला गावातील बहुसंख्य युवक, जेष्ठ नागरिक, महिला पुरूषांचा उस्फूर्त पाठिंबा दिला होता. उपोषणकर्त्यांना जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अंकुर देशपांडे, शिवसेनेचे युवा नेते योगेश जाधव, माजी समाज कल्याण सभापती बाबुराव मोरे, श्रीनिवास खेडेकर, शिवसेनेचे संदीप मगर तथा विविध राजकीय पक्षातील नेते तथा सामाजिक कार्यकर्त्यांनी भेटी देऊन पाठिंबा दिला होता. तसेच, ठाणेदार गजानन करेवाड यांनीदेखील उपोषणाला भेट देऊन माहिती घेतली होती.

Share This Article
Exit mobile version