निष्काम कर्मयोगी संत पू. शुकदास महाराजश्रींच्या जन्माेत्सव साेहळ्यासाठी विवेकानंद नगरी सज्ज!

admin 3 Min Read
3 Min Read

–  भव्य रोगनिदान शिबीर, विज्ञान प्रदर्शनी, आनंद मेळा, क्रीडा स्पर्धांचे आयोजन
– दि.१८ नोव्हेंबररोजी रूईखेड मायंबा येथे सालाबादाप्रमाणे भव्य यात्रोत्सव

हिवरा आश्रम (प्रतिनिधी) – निष्काम कर्मयोगी संत तथा विवेकानंद आश्रमाचे संस्थापक पू. शुकदास महाराज यांच्या जन्मोत्सवाचे विवेकानंद आश्रमाने दि.१७ नोव्हेंबररोजी आयोजन केले असून, यानिमित्त आरोग्य शिबीर, विज्ञान प्रदर्शनी, आनंद मेळा, क्रीडा स्पर्धा आदी पार पडणार आहेत. तर सालाबादाप्रमाणे याहीवर्षी दि.१८ नोव्हेंबररोजी रूईखेड मायंबा येथे यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

विवेकानंद आश्रमाचे संस्थापक, निष्काम कर्मयोगी संत प.पू. शुकदास महाराज यांनी शिक्षण, आरोग्य, कृषी, सामाजिक परिवर्तन, महिला सबलिकरण, अपंग पुर्नवसन, पर्यावरण सुरक्षा या व इतर क्षेत्रात प्रचंड कार्य केले. नवसमाज निर्मितीच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विवेकानंदांच्या विचारांचा व तत्वज्ञानाचा जीवनभर अंगिकार करून प्रचार व प्रचार केला. मनुष्य हा ईश्वराचेच रूप आहे. त्याची सेवा करणे हा परमार्थ आहे हा विवेकानंदांचा प्रॅक्टीकल वेदान्त आश्रमाच्या सेवा कार्याचे व जडणघडणीचे मुख्य तत्व आहे. निर्मनुष्य, ओसाड जागेवर उभा राहिलेला विवेकानंद आश्रम आज लक्षावधी तरूणांचे प्रेरणास्थळ बनला आहे. आधुनिक विवेकानंद या नावाने ओळखल्या जाणार्‍या महाराजांचा जयंती सोहळा कार्तिक वद्य त्रयोदशी दि.१७ नोव्हेंबररोजी आश्रमात संपन्न होत आहे. त्यासाठी विवेकानंद नगरी सज्ज झाली आहे. सकाळी ५ ते ६ हरिहरतीर्थावर मंगलधून, ६ ते ७ ग्रामसफाई त्यानंतर दिंडी प्रदिक्षणा, सकाळी ९ वाजता समाधी स्मारक मंदिरात मूर्तीचे विधिवत पूजन होईल. ११ वाजता आश्रमाच्या व्यासपीठावर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आहे. या स्पर्धेत जिल्हाभरातून बालवक्ते सहभागी होणार आहेत. स्पर्धेचा विषय ‘सोशल मीडियाने हरवलेलं बालपण’ हा आहे. ग्रामीण रूग्णालयात भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर सेवा देणार आहेत. विवेकानंद ज्ञानपीठ शाळेमध्ये आनंद मेळाव्याचे आयोजन केले आहे. अपंग विद्यालयात हस्तकला प्रदर्शन, विद्या मंदिरामध्ये विज्ञान प्रदर्शन व क्रीडा स्पर्धा आयोजित केली आहे. महाविद्यालयामधून विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. सायंकाळी ६ ते ७ व्यासपीठावर भक्तीगीत गायन व प्रार्थना आश्रमाचा गायक वादक वृंद सादर करील. वृध्दांना कपडे वाटप, विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण होईल. रात्री ८ वाजता हभप. गजाननदादा पवार शास्त्री महाराज यांचे प्रवचन व रात्री ९ वा. उत्सव समितीची सभा संपन्न होईल. कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. भाविकांनी थंडी लक्षात घेता उबदार कपडे सोबत ठेवावेत, तसेच जास्तीत जास्त भाविकांनी आरोग्य शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

Share This Article
Exit mobile version