– काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचा अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत हातात ‘हात’! – मतविभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांची मोट; नांदेड नंतर आता बुलढाण्यात युती! – बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्यात काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी घोषणा काल, दि. १४ नोव्हेंबररोजी स्थानिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत संबंधित पक्षाच्या जिल्हास्तरीय नेत्यांनी केली. नांदेडनंतर आता बुलढाणा जिल्ह्यात सदर युती पहावयास मिळणार आहे. मतविभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षांनी एकी केल्याचे यावेळी सांगण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलणार असल्याचेही सांगितले जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरणे सुरू झाले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीची घोषणा पण काही दिवसात होणार आहे. त्या दृष्टीने सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत तर दगाफटका होऊ नये म्हणून योग्य सवंगडी शोधण्यातही पक्ष भिडले आहेत. गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी व वंचितच्या युतीचे गुर्हाळ बरेच दिवस सुरू राहिले, परंतु त्यातून कोणताच ‘गोडवा’ निघाला नाही. वंचित बहुजन आघाडीला सोबत न घेतल्याने महाविकास आघाडीचा पराभव झाला, असा कयास लावला जात असून, यामध्ये सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसलाही मोठे अपयश पहावे लागले. पुन्हा हेच अघटीत घडू नये, यासाठी काँग्रेसही आता ताक फुंकून प्यायला लागल्याचे दिसून येत आहे. तर यासाठी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ चांगलेच कामाला लागले आहेत. दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडून येईल, एवढी ताकद त्यांचीही निश्चितच नाही, हेसुद्धा समजून आले आहे. यामध्ये मतविभाजन होवून तिसर्याचा फायदा होतो हे वेळोवेळी दिसून आले आहे. वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनीही भाजप व त्यांच्या मित्र पक्षाशी सोडून इतर समविचारी पक्षांशी युती करण्याचे आदेश जिल्हास्तरीय नेत्यांना दिले होते. दुसरीकडे, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीदेखील वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याबाबतचे अधिकार स्थानिक पदाधिकार्यांना दिले आहेत. तर याबाबत काही दिवसांपूर्वीच प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांना प्रस्तावदेखील दिला होता. दोन्ही पक्षाच्या जिल्हास्तरीय पदाधिकार्यांनी काल दि.१४ नोव्हेंबररोजी येथील पत्रकार भवन येथे तातडीच्या पत्रपरिषदेचे आयोजन करत काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केली तर ही युती नगरपरिषद निवडणुकीसाठी असून, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीही युती कायम राहील, असेही सांगण्यात आले. तर नगरपरिषदेच्या जागावाटपाची बोलणी लवकरच होईल, असेही सांगण्यात आले. महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला येणार्या जागांमधून वंचित आघाडीला जागा देण्यात येतील, असेही यावेळी सांगितले गेले.ज् ाातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी व धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याने ही आघाडी निर्णायक ठरेल, असाही विश्वासही यावेळी दोन्ही पक्षाच्या पदाधिकार्यांनी व्यक्त केला. यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलणार असल्याचे बोलले जात आहे. या पत्रकार परिषदेला काँग्रेसच्यावतीने जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, आमदार धीरज लिंगाडे, माजी सभापती दिलीप जाधव, वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष निरीक्षक सविताताई मुंडे, राज्य प्रतिनिधी साहेबराव तायडे, वंचितचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे, जिल्हा सचिव प्रशांत वाघोदे, दत्ता काकस, रिजवान सौदागर, शहराध्यक्ष मिलिंद वानखडेसह पदाधिकारी उपस्थित होते.
दोन्ही पक्षाकडून युतीची घोषणा करण्यात आली असून, वंचित आघाडीकडून शेगाव, जळगाव जामोद, खामगाव, देऊळगावराजासह काही नगराध्यक्ष पदाची मागणी करण्यात आली असल्याचे कळते आहे. वाटाघाटीतून यातून सकारात्मक तोडगा निघेल, असेही दोन्ही पक्षांच्या राजकीय नेत्यांचे म्हणणे आहे.