साखरखेर्डा (अशोक इंगळे) – येथून जवळच असलेल्या गोरेगाव येथील महाजल योजनेचे काम पूर्ण झाले आहे. अशी लेखी ग्रामपंचायतीने देऊन नागरिकांची फसवणूक केली आहे. काम पूर्ण झाले पण नळाला पाणी का येत नाही, याची चौकशी करून दोषी ठेकेदार, अधिकारी, आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करीत गोरेगाव ग्रामपंचायतीसमोर दोन युवकांनी काल, दि.१३ नोव्हेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
गोरेगाव येथे महाजल योजनेतून राजेगाव तलावावर विहीर खोदली असून, पाईपलाईन टाकण्यात आली आहे. गावात पाणी पुरवठा करण्यासाठी जलकुंभ बांधण्यात आले आहे. हे जलकुंभ वादळी वार्यात नागासारखे डोलते. ते केव्हा कोसाळेल याची शाश्वती नाही. आजपर्यंत एकही दिवस या जलकुंभात पाणी भरले नाही, आणि गावाला पाणी पुरवठा करण्यात आला नाही. गावातील नागरिकांना शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावे वॉटर फिल्टर मशीन खरेदी करण्यात आली होती. ती आजपर्यंत कोठेही बसविण्यात आली नाही. परंतु, दुरुस्तीचे हजारो रुपये बिल काढून सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी पैशाचा अपव्यय केला आहे. गोरेगाव येथील युवकांसाठी व्यायाम शाळा बांधण्यात आली आहे, लाखो रुपयांचे साहित्य खरेदी करण्यात आले आहे. आजरोजी साहित्यासह व्यायाम शाळा चोरीला गेली आहे. याची तक्रार ग्रामपंचायत अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांनी पोलिस स्टेशनला देऊन मुद्देमाल जप्त करण्यात यावा. १५ व्या वित्त आयोगाच्या कामाची माहिती ग्रामसभा घेऊन नागरिकांना द्यावी. सन २०१९ पासून किती ग्रामसभा घेण्यात आल्या याची माहिती देण्यात यावी. या मागण्यासह अनेक मागण्या त्यांनी केल्या आहेत. या अगोदर माहिती अधिकारात ग्रामपंचायतकडे माहिती मागितली होती. परंतु, ती त्रोटक स्वरूपात असून, वरिष्ठ अधिकार्यांनी याची दखल घेऊन चौकशी करावी, आणि ग्रामस्थांना न्याय द्यावा, अशी मागणी उपोषणकर्ते नितीन गजानन पंचाळ आणि जीवन पंचाळ यांनी केली आहे. या उपोषणाला शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबूराव मोरे, श्रीनिवास खेडेकर, संदीप मगर यासह अनेकांनी भेटी दिल्या आहेत. परंतु, तोडगा निघाला नाही.